प्रसाद रावकर

प्रकल्पस्थळी विनाकारण अतिरिक्त जागा व्यापणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा

मेट्रोच्या कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जागा व्यापली असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे पालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाच्या (एमएमआरडीए) निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत एमएमआरडीएने व्यापलेली अतिरिक्त जागा वाहतुकीसाठी मोकळी करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तर पालिका आयुक्तांनी यावर करडी नजर ठेवण्याची सूचना पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना केली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबईमधील वाहतुकीला गती देण्यासाठी, तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता यावा यादृष्टीने पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये एमएमआरडीएतर्फे मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. दहिसर (पूर्व) ते डी. एन. नगर दरम्यान ‘मेट्रो २ अ’, डी. एन. नगर ते मंडाले दरम्यान ‘मेट्रो २ ब’,  दहिसर ते अंधेरी दरम्यान ‘मेट्रो-७’, वडाळा ते कासारवडवली दरम्यान ‘मेट्रो ४’ प्रकल्प उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मार्गरोधक (बॅरिकेड) बसविण्यात आले आहेत.

उपनगरांतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांविषयी पालिका मुख्यालयात पालिका आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते. मेट्रोचे काम सुरू असलेल्या एका ठिकाणी रस्त्याचा अतिरिक्त भाग व्यापण्यात आल्याची बाब अजोय मेहता यांनी आर. ए. राजीव यांच्या निदर्शनास आणून दिली. कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या अतिरिक्त भाग व्यापल्यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून त्याचा नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे व्यापलेला अतिरिक्त भाग मोकळा करावा, अशी सूचना अजोय मेहता यांनी बैठकीत केली. तसेच या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आर. ए. राजीव यांनी स्पष्ट केले.

पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच मेट्रोच्या कार्यस्थळी रस्त्याचा अतिरिक्त भाग मार्गरोधकाद्वारे अडविण्यात आला असेल तर त्याबाबत एमएमआरडीएच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि तो भाग वाहतुकीसाठी खुला करून घ्यावा, अशी सूचना अजोय मेहता यांनी साहाय्यक आयुक्तांना केली. त्याचबरोबर मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पडलेली माती वेळीच उचलून नेण्यात येत आहे की नाही यावरही बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना केले आहेत.

मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी विनाकारण रस्त्याचा अतिरिक्त भाग मार्गरोधकाद्वारे अडविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येईल.

– आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए