News Flash

टोल कोंडी फुटणार!

मुंबई-ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील बंद पडलेल्या जकात नाक्यांवर अतिरिक्त मार्गिका

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई-ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील बंद पडलेल्या जकात नाक्यांवर अतिरिक्त मार्गिका

मुंबईतून ठाणे -दहिसर-वाशीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या किंवा मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांची लवकरच टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी आणि लांबच लांब रांगांच्या त्रासातून सुटका होणार आहे. या सर्व टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिरिक्त मार्गिका निर्माण करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागांवर या अतिरिक्त टोल वसुली मार्गिका निर्माण करण्यात येणार असून, त्यासाठी जागा देण्यास महापालिका आयुक्तांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईच्या प्रवेशद्वारावर ऐरोली, वाशी, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी टोलनाके असून, हे सर्वच टोलनाके सध्या वाहतूक कोंडीचे आगार ठरू लागले आहेत. या टोलनाक्यांवर सकाळ-संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने टोलसाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. अरुंद आणि अपुऱ्या टोल वसुली मार्गिकांमुळे आणि टोल नाक्यांच्या रुंदीकरणासाठी आसपास जागाच उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतून पूर्व मुक्त मार्गाने सुसाट गेलेल्या वाहनधारकांना अनेकदा मुलुंड, वाशी टोलनाक्यांवर तासभर ताटकळत उभे राहावे लागते. पश्चिम द्रुतगती महामार्गाने जाणाऱ्या वाहनांना दहिसर टोलनाक्यावरही अशाच संकटांचा सामना करावा लागतो. टोलनाक्यावरील या वाहतूक कोंडीच्या समस्येने हैराण झालेल्या मुंबई-ठाणेकरांना येत्या दोन-तीन महिन्यांत दिलासा देण्याची तयारी एमएसआरडीसीने सुरू केली आहे.

मुंबई पोलिसांनीही जकात नाक्यांची जागा मागितली होती. मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्नही महत्त्वाचा असल्याने ही जागा मिळावी अशी मागणी करीत एमएसआरडीसीने एक प्रस्ताव मुंबई महापालिकेस पाठविला आहे. त्यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यात बैठकही झाली. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त स्थळ पाहणी झाली आहे. त्यानुसार टोल मार्गिकांसाठी ही जागा देण्यास पालिका तयार असून, लवकरच अंतिम निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. ही जागा ताब्यात मिळाल्यावर त्यावर दोन महिन्यांत ठेकेदार टोल वसुली मार्गिका उभारेल. या अतिरिक्त मार्गिकांमुळे टोलनाक्यांवरील कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, असे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक किरण कुरूणकर यांनी सांगितले.

कोंडी फुटावी म्हणून..

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यावर सध्या टोलवसुलीसाठी १६ मार्गिका आहेत. मात्र सकाळच्या वेळी मुंबईच्या दिशेने, तर संध्याकाळी उलटय़ा दिशेने जाणाऱ्या वाहनांची अधिक संख्या लक्षात घेऊन, पलीकडील रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून या मार्गिकांची संख्या तात्पुरती वाढविली जाते. परिणामी दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कायम स्वरूपी या मार्गिका वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सर्व टोल नाक्यावरील मार्गिकांची संख्या १६ वरून २८ ते ३० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. महापालिकेची जकात बंद झाल्याने तेथे उपलब्ध असलेल्या जागेवर या अतिरिक्त टोल मार्गिका उभारण्यात येणार आहेत.

जकात नाक्याच्या जागेवर अतिरिक्त टोल मार्गिका उभारण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या जागेवर बाहेरून येणाऱ्या बससाठी टर्मिनस उभारण्याचाही प्रस्ताव आहे. प्रस्तावित सागरी किनारा मार्गासाठी कास्टींग यार्डसाठीही जागेची गरज असून या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आराखडा तयार केला जात आहे.  – अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:06 am

Web Title: traffic jam on toll naka 3
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांची गुंडगिरीला ‘मनसे’ साथ!
2 ‘राज्यात सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर बंदी’
3 राज्यातील धर्मादाय रुग्णालयांकडून रस्त्यावरील गरीब रुग्णांना ‘आरोग्य कवच’!
Just Now!
X