पश्चिम उपनगरात वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारपाठोपाठ रविवारीही या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझजवळ असलेल्या वाकोला पुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी संध्याकाळी संपले. त्यानंतरही काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

मुंबई एण्ट्री पॉइंट या कंपनीतर्फे या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस हे काम चालू होते. त्यापैकी शनिवारी पश्चिम द्रुतगती महामार्गावर या पुलाच्या कामामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक कूर्मगतीने सुरू होती. जोगेश्वरी ते वांद्रे या टप्प्यात शनिवारी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सुटीच्या दिवशी दक्षिण मुंबईकडे येणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. या वाहतूक कोंडीचा परिणाम थेट बोरिवलीपर्यंत जाणवत होता.