जेएनपीटी येथील जासईजवळ विजेचा खांब रुळांवर

कानपूर रेल्वे अपघातात आयएसआयचा हात असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मध्य रेल्वेवर सोमवारी झालेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर बुधवारीही जेएनपीटी परिसरातील जासई येथे रुळांवर विजेचा खांब आडवा टाकलेला आढळला. या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाला हा खांब दिसल्यामुळे पुढील अपघात टळला. विशेष म्हणजे मुंबई विभागात झालेले घातपाताचे सर्व प्रयत्न आतापर्यंत लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळले आहेत. याबाबत पनवेल पोलिसांमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून वारंवार घडणाऱ्या या घटनांचा छडा लावण्यासाठी गुन्हे विभागही रेल्वेच्या मदतीला आला आहे.

मध्य रेल्वेवर पनवेल-जेएनपीटी यांदरम्यान मालवाहतूक होते. या वाहतुकीला जेएनपीटी बंदरामुळे महत्त्व आहे. त्याशिवाय जासई येथे मध्य रेल्वेची काही गोदामे आहेत. बुधवारी दुपारी ३.५० च्या दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाला रुळांवर एक खांब आडवा पडलेला दिसला. त्याने प्रसंगावधान दाखवून वेळीच गाडी थांबवली आणि संभाव्य अपघात टळला. हा अपघात झाला असता, तर काही काळ जेएनपीटी बंदराशी असलेला रेल्वे संपर्क खंडित झाला असता. अधिक तपास केला असता हा खांब रेल्वेच्याच ओव्हरहेड वायरचा असल्याचे आढळले. हा खांब सुमारे सात मीटर लांब होता. तो तेथे कोणी ठेवला, याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

याआधी २४ जानेवारीला दिवा स्थानकाजवळ सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा रुळांवर आडवा टाकलेला आढळला होता. त्यानंतर सोमवारी पनवेल-दिवा यांदरम्यान रुळाचा तुकडा सापडला होता. या दोन्ही घटनांमध्ये पॅसेंजर गाडय़ांचा सहभाग होता आणि या वेळी लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठय़ा दुर्घटना टळल्या होत्या. आता पंधरवडाभरात तिसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, राज्य पोलीस एकत्रितपणे तपास करणार आहेत. या तपासात आता गुन्हे विभागही सहकार्य करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले.

केंद्राकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत रेल्वेत घडलेल्या ‘असामान्य’ कारवायांबाबत चिंता व्यक्त करतानाच, रेल्वे रुळांवर घातपात करण्याचे तसेच स्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत केला. अलीकडे रेल्वेमार्गावर स्फोटाचे ७ प्रयत्न, तसेच घातपाताच्या प्रयत्नांची ३ प्रकरणे घडली असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत अनेक पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. उत्तर प्रदेशात कानपूरनजिक एक गाडी रुळांवरून घसरण्याशी संबंधित प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आधीच तपास करत असल्याचे ते म्हणाले.