प्रसाद रावकर

गेली अनेक वर्षे ऊन-पावसात गलितगात्र झालेल्या चाळींतील छोटय़ाशा घराच्या बदल्यात मोठे घर मिळेल हे स्वप्न मनी बाळगून अनेक रहिवाशांनी पुनर्विकासाची वाट मळायला सुरुवात केली. गेल्या तीन-चार दशकांमध्ये पुनर्विकासामध्ये चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. चाळीत छोटय़ाशा घरात संसार करणारी मंडळी मोठय़ा घरात विसावली.

ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाऊल टाकले आणि देशावर राज्य गाजवायला सुरुवात केली. त्या काळी मुंबई सात छोटय़ा-छोटय़ा बेटांमध्ये विखुरली होती. नारळी-पोफळीच्या बागा, कच्चे रस्ते, छकडा, टांग्यातून होणारे दळणवळण, झुळुझुळु वाहणाऱ्या नद्या, काठावर उभी बंदरे, बंदरांवर सुरू असलेली जहाजांची ये-जा, असे त्या काळी मुंबईचे चित्र होते. हळूहळू मुंबईने कात टाकायला सुरुवात केली आणि विकासाची कास धरली. ब्रिटिशांनी गरजेनुसार वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना ठरतील अशा वास्तू मुंबईत उभ्या केल्या. हळूहळू सात बेटे जोडली गेली आणि एकसंध मुंबई आकाराला आली. हवेत धुराच्या रेषा सोडत रेल्वे धावू लागली. त्यापाठोपाठ शहरात एकामागून एक कापड गिरण्या उभ्या राहिल्या. स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला आणि ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सर्वत्र जल्लोष झाला. मुंबईत गिरण्यांची धडधड सुरू झाली आणि रोजगाराची मोठी संधीच चालून आली. हाताला हमखास काम मिळणार याची खात्री पटल्याने महाराष्ट्राच्या गाव-खेडय़ातूनच नव्हे तर आसपासच्या राज्यातून मोठय़ा प्रमाणावर तरुण मुंबापुरीत डेरेदाखल होऊ लागले.

रोजगाराच्या निमित्ताने शहरात येणाऱ्यांच्या निवाऱ्याची गरज ओळखून अनेक व्यापारी, प्रतिष्ठित मंडळींनी तीन-चार मजली इमारती उभारण्यास सुरुवात केली. छोटय़ा एक-दोन खोल्यांची असंख्य घरे लांबलचक चाळीत उभी राहू लागली. दिवसभर घरात लख्ख प्रकाश आणि खेळती हवा राहावी याची काळजी घेऊनच बहुसंख्य चाळी उभ्या करण्यात आल्या. त्या काळी उभारलेल्या असंख्य चाळी आजही दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात. या चाळी गिरणी कामगारांच्या कुटुंबांचा आधार बनला. विविध प्रांतांतील या मंडळींची संस्कृती जपत आजही या चाळी उभ्या आहेत. इंच इंच जमिनीचा वापर करून एकमेकांच्या अगदी जवळ उभारलेल्या या चाळींमुळे आज अनेक प्रश्न  निर्माण झाले आहेत. शहर भागात जागा कमी पडू लागल्याने मुंबई पूर्व आणि पश्चिम भागात पसरू लागली. शहरालगत उपनगरे उभी राहिली. कुटुंबकबिल्यात सदस्यांची संख्या वाढली आणि शहरातील छोटी खोली अपुरी पडू लागली. त्यामुळे अनेकांनी उपनगरांची वाट धरली आणि उपनगरेही गजबजून गेली.

मुंबईमधील कापड गिरण्या बंद पडल्या आणि गिरण्यांच्या जागांचा विकास करण्याचे वाहू लागले. हळूहळू विकासाचे हे वारे चाळींमध्येही घोंघावू लागले. गेली अनेक वर्षे ऊन-पावसात गलितगात्र झालेल्या चाळींतील छोटय़ाशा घराच्या बदल्यात मोठे घर मिळेल हे स्वप्न मनी बाळगून अनेक रहिवाशांनी पुनर्विकासाची वाट मळायला सुरुवात केली. गेल्या तीन-चार दशकांमध्ये पुनर्विकासामध्ये चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. चाळीत छोटय़ाशा घरात संसार करणारी मंडळी मोठय़ा घरात विसावली.

बाका नगरी मुंबईत हमखास हाताला काम मिळते, कुणीच उपाशी राहू शकत नाही अशी या शहराची ओळख बनली. त्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये रोजगारासाठी लोंढेच्या लोंढे मुंबईत थडकू लागले. चाळींमध्ये घर घेणे परवडणारे नसल्याने अनेकांनी झोपडपट्टय़ांचा आश्रय घेतला. हळूहळू मुंबईत झोपडपट्टय़ांची संख्या वाढू लागली आणि एकेकाळी वृक्षवल्लीने नटलेली मुंबई झोपडपट्टय़ांमुळे बकाल बनू लागली. नदी, खाडी काठावरच नव्हे तर नाल्यांजवळही झोपडपट्टय़ा दिसू लागल्या. त्यामुळे नद्यांचे नाले बनले आणि नाल्यांची गटारे. मुंबईचा श्वास घुसमटू लागला. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन नव्या नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा विकासाचे एक पाऊल पुढे पडले. ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’च्या निमित्ताने झोपडपट्टीच्या जागी इमारती उभ्या राहू लागल्या. मात्र अनेक झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी या झोपडपट्टय़ा पुनर्विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत.

वाढती लोकसंख्या, उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती यामुळे मुंबईचे रूपडे बदलले असले, तरी मुंबईकरांना अनेक नव्या समस्या भेडसावू लागल्या. जल, मलवाहिन्यांचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली. वाहतूक कोंडीचा प्रश्न भीषण बनला. त्यावर तोडगा म्हणून मुंबईत मोनो, मेट्रोचे जाळे उभे राहू लागले. मुंबईतून पश्चिम उपनगरात जलदगतीने पोहोचता यावे यासाठी सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याच्या योजनाही आखण्यात आल्या आहेत. एकूणच एकेकाळी नारळी, पोफळीच्या वाडय़ांनी सजलेली मुंबई पुढील काही वर्षांमध्ये पुन्हा एकदा कात टाकण्याच्या बेतात आहे.