मुंबई : विधान परिषदेच्या निकालांबाबत आत्मचिंतनाची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच आहे, असे सांगत तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले असा खोचक टोला परिवहनमंत्री अनिल परब यांनी लगावला. अमरावती शिक्षक मतदारसंघातील निकालाबाबत बोलताना ती जागा यापूर्वीही शिवसेनेची नव्हती. याआधी तिथे अपक्षच उमेदवार निवडून आले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वाचाळवीरांना चपराक -पवार

शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी पदवीधर निवडणुकीसाठी एक वेगळा प्रयोग केला. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळाले. वाचाळवीरांना या निकालातून जोरदार चपराक बसली आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपवर टीका केली.

सुशिक्षित मतदारही भाजपविरोधात -थोरात

शेतकरी, कामगार हे तर पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेले आहेत. आता सुशिक्षित मतदारांनीही भाजपची विचारसरणी पूर्णपणे नाकारली आहे. हे निकाल त्याचीच सुरवात आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.