प्रभादेवी स्थानकातील चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पादचारी पुलांची कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र २०१८-१९ मध्ये सेवेत येणारे ४१ नवीन पादचारी अद्यापही प्रवाशांच्या सेवेत आलेले नाहीत. यात एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एमयुटीपी-३ प्रकल्पातील दोन स्थानकादरम्यान बांधण्यात येणाऱ्या २३ पादचारी पुलांच्या कामांना तर सुरूवातही झालेली नाही.

मार्च २०१८ मध्ये एल्फिन्स्टन-परळ जोडपूल, करी रोड पूल आणि आंबिवली  पुलांचे उद्घाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी जून २०१८ पर्यंत २२ पादचारी पूल बांधले जाणार असल्याचे गोयल यांनी सांगितले होते. तर एक ते दोन वर्षांत मोठय़ा संख्येने पादचारी पूल सेवेत येतील अशी माहिती दिली होती. परंतु २०१८ ते २०१९ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत नव्याने येणाऱ्या ४१ पादचारी पुलांच्या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. यात मध्य रेल्वेकडून उभारण्यात  येणाऱ्या आठ व पश्चिम रेल्वेच्या १० पादचारी पुलांचा समावेश असून एमआरव्हीसीकडूनही बांधल्या जाणाऱ्या एमयुटीपी प्रकल्पातील २३ पूल आहेत.

रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी दोन स्थानकादरम्यान पादचारी पुल उभारण्याची योजना एमआरव्हीसीने आखली आहे. २०१८-१९ मध्ये २३ पादचारी पूल सेवेत येणे अपेक्षित होते. परंतु काही ठिकाणी पूल उभारण्यासाठी निर्माण झालेले तांत्रिक मुद्दे व वारंवार काढण्यात आलेल्या निविदा त्यामुळे एमआरव्हीसीच्या पुलांच्या कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. काही पुलांच्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहे. मात्र पूल सेवेत येण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

एमआरव्हीसी एमयुटीपी-३ मधील पुलांची प्रतिक्षा

मध्य रेल्वे : नाहूर ते मुलुंड दरम्यान दोन पूल, ठाणे ते दिवा, ठाणे ते ऐरोली, दिवा ते दातिवली, कोपरजवळ, शहाड, शहाड ते आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ, शिवडी, गोवंडी ते मानखुर्द, मानखुर्द ते वाशी, वाशी ते सानपाडा.

पश्चिम रेल्वे :  लोअर परळ, माहिम, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव

मध्य रेल्वेकडून कामे हाती न घेतलेल्या पुलांची नावे

– दादर, विक्रोळी, वडाळा रोड, गोवंडी, करी रोड, टिळक नगर, उल्हासनगर, कसारा

पश्चिम रेल्वेकडून कामे हाती न घेतलेल्या पुलांची नावे

– मरीन लाईन्स, गॅ्रण्ट रोड स्थानकातील दोन, मुंबई सेन्ट्रल स्थानकातील दोन, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, वसई रोड