10 August 2020

News Flash

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १ लाख ४१ हजार रुग्णांवर उपचार

१२ कोटी लोकांना याचा लाभ घेता येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’च्या माध्यमातून करोना काळात आतापर्यंत तब्बल एक लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात करोनाच्या हजारो रुग्णांसह कर्करोग, हृदयविकार, मूत्रिपडविकाराच्या रुग्णांचा प्रामुख्याने समावेश असून, यासाठी तब्बल ३५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत ९९६ आजारांवर उपचार केले जातात, तर पंतप्रधान जीवनदायी योजनेतून १,२०९ आजारांवर उपचार होतात. या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी अलीकडेच नव्याने निविदा काढताना ज्या आजारांचा लाभ फारच कमी लोक घेतात असे आजार काढून त्याजागी नवीन आजारांचा समावेश केला आहे. परिणामी जास्तीत जास्त रुग्णांना उपचारांचा लाभ घेता येईल. तसेच मागील काळात या योजनेत सुमारे साडेचारशे रुग्णालयांचाच केवळ समावेश होता. ही व्याप्ती वाढवून आज एक हजार रुग्णालयांत या योजनेअंतर्गत उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात गुडघेबदल शस्त्रक्रियेसह १२० प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची योजना डॉ. सुधाकर शिंदे यांनी लागू केली.

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने २३ मे रोजी या योजनेची व्याप्ती नव्याने वाढवली. या योजनेत आता राज्यातील सर्व नागरिकांचा समावेश करण्यात आल्याने १२ कोटी लोकांना याचा लाभ घेता येणार आहे.

पांढरी शिधापत्रिका असलेल्या लोकांनाही २३ मे रोजी काढलेल्या शासन आदेशामुळे एक हजार रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार असून ३१ जुलैपर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. जुलैमध्ये पुन्हा या योजनेचा आढावा घेऊन आणखी मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

करोना काळात सर्वसामान्यांसाठी वरदान : मार्चपासून २६ जूनपर्यंत ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून तब्बल एक लाख ४१ हजार ५७८ रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला. यात करोनाच्या सुमारे नऊ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर कर्करोगाच्या ४७,६६७ रुग्णांवर उपचार केले गेले. या रुग्णांवरील उपचारांपोटी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेतील एक हजार रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टरांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून ‘पीपीई किट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या भीतीपोटी बऱ्याच खासगी रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या रुग्णालयातून ४७ हजार कर्करुग्णांवर झालेले उपचार ही मोठी कामगिरी असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:19 am

Web Title: treatment of 1 lakh 41 thousand patients under mahatma phule janaarogya yojana abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 आरोग्य भवनातील ३५ जण करोनाबाधित
2 कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाइन रोजगार मेळावे
3 ..तरीही २५व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी
Just Now!
X