हसतमुख चेहरा आणि सहजसुलभ अभिनयाची दैवी देणगी घेऊन आलेल्या सुलभाताईंनी चाहत्यांच्या मनात अमीट ठसा उमटवला होता. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे (पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर) यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘आविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे बीज रोवले.
‘रेनेसाँ’च्या काळात समाजजीवन ढवळून निघाले असताना त्याचे परिणाम नाटय़-चित्रपट क्षेत्रावरही तितक्याच वेगाने झाले. त्याचवेळी सुलभाताईंचा रंगभूमीशी प्रथम संबंध आला. तेव्हा नवविचाराचे वारे ‘रंगायन’च्या निमित्ताने उभे राहिले होते. विजयाबाई मेहता यांनी स्थापन केलेल्या या ‘रंगायन’च्या प्रवाहात त्या सामील झाल्या आणि मग त्याच ‘रंगायन’चे बोट पकडून प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने काम करता करता तिथून बाहेर पडून १९७१ साली पती अरविंद देशपांडे यांच्याबरोबरीने त्यांनी ‘अविष्कार’ची सुरुवात केली. पहिल्यांदा छबिलदास शाळेच्या सभागृहात मुहूर्तमेढ झालेली या ‘अविष्कार’ची नाटय़चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवली.
‘शांतता कोर्ट चालू आहे’ या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या शिक्षिकेची त्यांची भूमिका अतिशय गाजली. या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची ताकद पहिल्यांदा जगाला दाखवून दिली. याच नाटकावर याच नावाचा चित्रपटही १९७१मध्ये आला आणि त्याचीही रसिकांनी दखल घेतली.

‘जैत रे जैत’(१९७७), ‘चौकट राजा’(१९९१), ‘विहीर’(२००९), ‘हापूस’(२०१०), ‘मला आई व्हायचंय’ (२०११) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’(२०१३) हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला.
रंगभूमीपुरती आपली अभिनयकला मर्यादित न ठेवता त्याच वेळी हिंदीत जो समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला होता त्यातही सुलभाताई तितक्याच उत्साहाने सामील झाल्या. हिंदीत ‘भूमिका’(१९७७/ दिग्दर्शन शाम बेनेगल), ‘अरविंद देसाई की अजब दास्ता’(१९७८), ‘गमन’(१९७८/ दिग्दर्शन मुजफ्फर अली), ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’(१९८०), ‘विजेता’(१९८२), ‘भीगी पलके’(१९८२), ‘इजाजत’(१९८७/ दिग्दर्शन गुलजार), ‘विरासत’(१९९७) हे त्यांचे चित्रपट गाजले. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ (२०१२) हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा हिंदी चित्रपट ठरला. परदेशातील आपल्या नातीला ‘गौराई माझी नवसाची’ हे गाणे शिकवणारी त्यांची आजी कित्येक लहानथोरांच्या मनात घर करून आहे. शाम बेनेगल दिग्दर्शित ‘कोंडुरा’ (१९७८) या हिंदी तसेच तेलुगू तसेच ‘जादू का शंख’ (१९७४/ दिग्दर्शन सई परांजपे) या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ‘राजा रानी को चाहीए पसीना’(१९७८) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला बालचित्रपट होता.
त्यांनी अनेक हिंदी व मराठी मालिकांतही काम केले होते. तीन वर्षांपूर्वी हिंदीत ‘सोनी’ वाहिनीवरील ‘कहता है दिल जी ले जरा’ या मालिकेतून त्यांनी एक छान आजी रंगवली होती. त्याहीवेळी पंच्याहत्तरी पार केलेल्या सुलभाताईंचा उत्साह हा तरुण कलाकारांनाही लाजवणारा होता. त्यावेळी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला येत नाही, अशी तक्रोर त्यांनी केली होती. मात्र ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ मालिकेमुळे त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली.
नाटय़चळवळीचा भाग होऊन राहणे एकवेळ सोपे, पण ज्या विचारांच्या मुशीत आपण तयार झालो त्यांची मुळे घट्ट पकडून चळवळीच्या माध्यमातून सतत नव्या पिढीपर्यंत ते विचार पोहोचवणे, त्यांना घडवणे हे कार्य फार कमी कलाकारांकडून घडते. सुलभाताई या अशा चळवळींच्या अध्र्वयू होत्या. अनेक कलावंत त्यांनी घडविले. १९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. तन्वीर पुरस्काराने २०१० साली त्यांच्या रंगभूमी सेवेचा गौरव करण्यात आला.