महाराष्ट्राचे तुकडे कदापी होऊ देणार नाही, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वतंत्र विदर्भसाठी निर्णायक लढा उभारण्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. इतकेच नव्हे तर स्वतंत्र राज्याची मागणी धसास लावण्यासाठी त्यांनी २१ ऑगस्टला अमरावतीमध्ये एक सर्वपक्षीय परिषद घेण्याचेही जाहीर केले आहे. आधीच अनेक मुद्यांवर एकमेकांच्या विरुद्ध तोंड करुन उभे असणाऱ्या शिवसेना-आरपीआयमध्येस्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरुन तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर देशात नवनवीन राज्यांची मागणी पुढे आली आहे. स्वंतत्र विदर्भ राज्याच्या मागणीलाही नव्याने जोर आला आहे. महाराष्ट्रात स्वंतत्र विदर्भ राज्य करण्यावरुन विविध राजकीय पक्षांमध्ये निरनिराळे विचारप्रवाह आहेत. काँग्रेसचे काही खासदार व आमदार स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत असले, तरी त्याबाबतची पक्षाची भूमिका दिल्लीतच ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात आहे. भाजपचा स्वतंत्र राज्याला पाठिंबा आहे. शिवसेनेचा मात्र पहिल्यापासून विदर्भाचे वेगळे राज्य करण्यास विरोध आहे. मात्र शिवसेनेशी युती असलेल्या आरपीआयनेही आता स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली आहे.  
अमरावतीत शनिवारी एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्वंतत्र विदर्भवाद्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर दुसऱ्या दिवशी रविवारी नागपूरमध्ये कार्यकर्ता शिबिरात बोलताना रामदास आठवले यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे ज्या अमरावतीमधून उद्धव यांनी स्वतंत्र विदर्भवाद्यांना इशारा दिला, त्याच शहरात आठवले यांनी २१ ऑगस्टला स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय परिषद घेण्याचे जाहीर केले.