करोनामुळे यंदा लांबणीवर गेलेल्या शिक्षणसत्राची पहिली घंटा खणखणली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, गुरुवारी जाहीर होईल. दुसरीकडे, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या महापालिका क्षेत्रांतील उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होणार आहे.

काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ जुलैपासून प्रवेश अर्जाचा भाग एक उपलब्ध होणार होता. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी येऊ नयेत, आवश्यक कागदपत्रे मिळवता यावीत, यासाठी पूर्वीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे संचालक दिनकर पाटील यांनी नमूद केले.

सुधारित वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना २२ जुलैपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल, तर उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती २४ जुलैपर्यंत ऑनलाइन प्रमाणित के ली जाईल. २६ जुलैपासून विद्यार्थी पालकांच्या मदतीने प्रवेश अर्जाचा भाग एक भरू शकणार आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी उपलब्ध होईल. प्रवेश प्रक्रियेची माहिती  https://pune.11thadmission.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर आहे.

सरावासाठी सुविधा

प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यात चुका होऊ नयेत, अर्ज भरण्याचा सराव व्हावा, यासाठी पहिल्यांदाच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रारूप संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. १६ ते २४ जुलैदरम्यान संकेतस्थळावर mock.demo.registration या लिंकवर अर्ज भरण्याचा सराव करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निकाल दुपारी १ वाजता

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येईल. दरवर्षी बारावीचा निकाल मेमध्ये जाहीर केला जातो. करोना संसर्गामुळे उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणींमुळे यंदा निकालास विलंब झाला. यंदा राज्यभरातील सुमारे १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १७ ते २७ जुलै या कालावधीत गुणपडताळणीसाठी, तर १७ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

इथे निकाल पाहा.. http://www.maharashtraeducation.com

http://www.mahresult.nic.in l http://www.hscresult.mkcl.org

‘सीबीएसई’ दहावीच्या गुणवंतांचा टक्का घसरला

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षीप्रमाणेच घसघशीत असले तरी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यंदा घटल्याचे दिसत आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा काही अंशाने वाढला असून देशाचा एकूण निकाल ९१.४६ टक्के आहे. मात्र, ९० ते ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास ३ टक्क्य़ांनी तर ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एका टक्क्य़ाने घटल्याचे दिसत आहे.