मुंबई : शहरात करोना प्रतिबंध लस उपलब्ध झाल्यानंतर साठवणुकीसह शीतसाखळीचे व्यवस्थापन आणि  प्रत्यक्ष लसीकरणाच्या दैनंदिन देखरेखीसाठी पालिका प्रशासनाअंतर्गत दोन कृती दल स्थापन करण्यात येणार आहेत.

देशात कोणती लस उपलब्ध होणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी ही लस लवकरच दाखल होण्याचे संकेत दिले जात आहेत. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार लसीकरणाची पूर्वतयारी पालिकेने सुरू केली आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा म्हणजे शीतसाखळीचे व्यवस्थापन. संशोधनात्मक टप्प्यावर असलेल्या तीन लशींपैकी दोन लशींचे जतन हे साधारणपणे २ ते ८ अंश से. तापमानाखाली करण्याचे सूचित केले आहे. तेव्हा लशीच्या साठवणुकीचे नियोजन, त्यासाठी आवश्यक सामग्री, साठवणूक केंद्रापासून लसीकरण केंद्रापर्यंत शीतसाखळीचे व्यवस्थापन यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र करोना कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. यात लो. टिळक, केईएम, नायर आणि कूपर या पालिके च्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक, अधिष्ठाता, सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख, उपायुक्त, राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांचा समावेश केलेला असून आणि दोन केंद्रीय आरोग्य विभागाचे प्रतिनिधीही असणार आहेत, अशी माहिती काकाणी यांनी दिली.