औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात मध्यरात्री झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यामध्ये एका दहावीतील मुलाचा मृत्यू झाला तर एका वृद्ध व्यक्तीचा दुकानातील सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाला. या व्यक्तिच्या दुकानाला जमावाने आग लावली. या हिंसाचारात १०० दुकानांचे नुकसान झाले असून मोठया प्रमाणावर वाहनांची तोडफोड जाळपोळ करण्यात आली.

या हिंसाचारात दोन कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तलवार, चाकू, लाठयाकाठयांसह सज्ज होऊन आलेल्या जमावाने तुफान दगडफेक केली. अनेक पोलिसही या दगडफेकी जखमी झाले आहेत. २५ ते ३० जण या हिंसाचारात जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

मोतीकारंजा भागातील रस्त्यावर जळालेली वाहने दिसत असून अनेक ठिकाणी दगडांचा खच पडला आहे.गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव असून या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते.

जमावबंदी लागू
औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अफवांमुळे हा वाद मोठा झाल्याचे सांगितले. स्थानिक आमदार अतुल सावे यांनी सुद्धा नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आता औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून संवेदनशील भागांमध्य मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.