‘सीपीपीआयबी’शी चर्चा सुरू – आर. ए. राजीव

मुंबई : वर्षअखेपर्यंत पूर्ण होणाऱ्या उपनगरातील मेट्रो प्रकल्पांमध्ये कॅनडातील गुंतवणूक कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास थेट सहा ते आठ हजार कोटी रुपये आगाऊ मिळू शकतील. या संदर्भात कॅनडा पेन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट बोर्डाशी (सीपीपीआयबी) चर्चा सुरू असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली.

आर. ए. राजीव यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सध्या ही योजना मसुदा स्वरुपात आहे. प्रवासी भाडे आणि त्याव्यतिरिक्त स्रोतातून मिळणाऱ्या ३० वर्षांच्या महसूलापोटी गुंतवणुकीस ‘सीपीपीआयबी’ इच्छुक आहे. या वर्षअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असणाऱ्या मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) आणि मेट्रो २ ए (दहिसर ते डी. एन. नगर) या दोन मार्गासाठी ही गुंतवणूक चर्चा सुरू आहे. दोन्ही मार्गाचा एकूण खर्च सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपये आहे. ‘सीपीपीआयबी’बरोबरचा व्यवहार पूर्ण झाला तर बांधकाम खर्चाच्या निम्म्याहून अधिक रक्कम, सहा ते आठ हजार कोटी रुपये दोन्ही मार्गिका सुरू होतानाच ‘एमएमआरडीए’ला परत मिळतील.

‘भाडे आणि त्या व्यतिरिक्त महसूलाच्या ७० टक्के रकमेपोटी ३० वर्षांसाठी गुंतवणूक करण्यात ‘सीपीपीआयबी’ने रस दाखवला आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ला ही रक्कम आगाऊ मिळेल’, असे राजीव यांनी सांगितले. मेट्रो प्रवासी भाडे दर आणि ३० वर्षांतील अपेक्षित प्रवासी यावरून नेमके मूल्य निश्चित करणे सुलभ होईल. दरम्यानच्या कालावधीत ‘सीपीपीआयबी’ प्रवासी भाडे वसूल करेल.

‘ठराविक प्रवासीसंख्येची मर्यादा ओलांडल्यानंतर मिळणाऱ्या अतिरिक्त महसुलासाठी  ‘सीपीपीआयबी’ ही ‘एमएमआरडीए’ची भागीदार असेल. मात्र अपेक्षित प्रवासी संख्या गाठली नाही तर महसूल तफावत राज्य सरकार भरेल. याबाबत सध्या चर्चा सुरू असून त्यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल आणि हे दोन्ही मेट्रो मार्ग वर्षअखेपर्यंत कार्यरत होतील अशी अपेक्षा राजीव यांनी व्यक्त केली.

अशा प्रकारचे मोठय़ा रकमेचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक निधी उभारणीच्या चर्चेबाबत राजीव म्हणाले, या माध्यमातून होणारी गुंतवणूक पुन्हा पायाभूत सुविधांच्या निधीसाठी खर्च करता येईल.’

करार अधिक पारदर्शक!

भविष्यात प्रवासी भाडे बदलाच्या निर्णयात खासगी गुंतवणूकदाराची भागीदारी असेल का, या प्रश्नावर ‘संबंधित करार हे अधिक गोळीबंद आणि पारदर्शक केले जातील. चर्चेतून ही बाब निकाली काढता येईल असे आर. ए. राजीव यांनी सांगितले. मेट्रो ७ ही मार्गिका १६.५ कि.मी.ची असून त्यासाठी सहा हजार ७४ कोटी रुपये, तर मेट्रो २ ए मार्गिका १८.५ कि.मी. असून त्यासाठी सहा हजार ४७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.