लेप्टो प्रतिबंधासाठी पालिकेची उंदीर नियंत्रण मोहीम

लेप्टोस्पायरोसिसच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेने उंदीर नियंत्रण मोहीम हाती घेतली असून गेल्या सहा महिन्यांमध्ये पालिकेतर्फे तब्बल दोन लाख ११ हजार ७०५ उंदरांचा संहार करण्यात आला.

उंदीर, घुशींमुळे लेप्टोस्पायरोसिस व प्लेग या रोगांचा प्रादुर्भाव होतो. लेप्टोस्पायरा या सूक्ष्मजंतूंमुळे लेप्टोस्पायरोसिस होतो. हे सूक्ष्म जंतू उंदरांसह अनेक प्राण्यांच्या मूत्राद्वारे पसरतात. लेप्टोस्पायरोसिस बाधित प्राण्याचे मलमूत्र माती, पाणी, अन्न, पेयजलात मिसळू शकते. याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात हे जिवाणू गेल्यास लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका असता. उंदीर आणि घुशींच्या केसामध्ये झिनॉपसिला चिओपिस या पिसवा आढळतात आणि त्यांच्यामुळे प्लेगची लागण होते. उंदीर वा घुशींचे आयुर्मान सुमारे १८ महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर साधारण २१ ते २२ दिवसांमध्ये मादी उंदीर पिल्लांना जन्म देते. एका वेळी साधारण पाच ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्मलेली पिल्ले पाच आठवडय़ांमध्ये प्रजननक्षम होतात आणि ते नव्या पिल्लांना जन्म देतात. अशा प्रकारे त्यांचा वंश कित्येक पटीने वाढत जातो. यानुसार साधारण एका वर्षांत उंदराच्या एका जोडीपासून अंदाजे १५ हजारांचा कुटुंबकबिला तयार होऊ शकतो. त्यामुळे उंदीर नियंत्रणाचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे, अशी माहिती कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

शहरांमधील स्वच्छतेचा अभाव, उघडय़ावर अन्नपदार्थ बनविणारे फेरीवाल्यांकडून रस्त्यावर फेकण्यात येणारा कचरा, सहजगत्या मिळणारे अन्नपदार्थ यामुळे उंदरांचा सुळसुळाट वाढतो.

उंदरांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे. उंदरांना घरात प्रवेश करता येऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. उंदरांना आसरा मिळणार नाही, खाद्यपदार्थ मिळणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. मोठय़ा प्रमाणावर असलेला उंदरांचा प्रजनन दर, उंदरांमुळे होणारा संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस याला आळा घालण्यासाठी पालिकेने उंदीर नियंत्रण मोहीम हाती घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.

उंदीर व घुशींच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी स्वच्छता राखणे, जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांच्या आधारे उंदरी इमारतींमध्ये शिरतात. हे लक्षात घेता या वाहिन्यांना जमिनीपासून दोन फूट उंचीवर मूषकरोधक बसविणे, तसेच उंदीर घरात शिरू नयेत यासाठी दगडी उंबरठा बसवून घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत.

अनुशक्तीनगर परिसरात उंदिर जास्त

जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत मुंबईत दोन लाख ११ हजार ७०५ उंदरांचा संहार करण्यात आला. पालिकेच्या चेंबूर, अणुशक्तीनगर आणि आसपासच्या परिसरात ३२ हजार ९३५ उंदरांचा, भायखळा परिसरात २३ हजार ७६२ आणि घाटकोपर विभागात २३ हजार ६८५ उंदरांचा संहार करण्यात आला.