सलग चौथ्या दिवशी समुद्रातील भरतीमुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर लाटांचे उधाण आलेले पहायला मिळाले. यावेळी मरीनड्राईव्ह येथील समुद्रकिनाऱ्यावर अतिउत्साहाच्या भरात समुद्राचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. यापैकी एकाला वाचवण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. मात्र, दुसऱ्या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे समजत आहे. या मुलाचे वय १४ वर्षे असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. मुंबईतील समुद्रात आज(रविवार) मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने यापूर्वीच दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले होते.