मुंबई : डीएन नगर ते मंडाले या मेट्रो २ बी मार्गिकेवरील कुर्ला टर्मिनल आणि एमएमआरडीए कार्यालय ही दोन स्थानके वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता कुर्ला स्थानकावरून मेट्रो स्थानक गाठण्यासाठी मध्य रेल्वेच्या तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांना सुमारे अर्धा किमी चालावे लागेल. मेट्रो २ बी मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि निविदेत या स्थानकांचा उल्लेख आहे. मात्र नव्या माहितीनुसार ही स्थानके वगळली आहेत.

कुर्ला टर्मिनल मेट्रो स्थानक हे मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकाच्या समीप होते. हे स्थानक आणि नजीकचे एस जी बर्वे मार्ग मेट्रो स्थानक या दोहोतील अंतर केवळ ४७४ मीटर आहे. तसेच येथे फनेल झोनमुळे उंचीस असलेल्या मर्यादेमुळे हे स्थानक वगळल्याचे कारण एमएमआरडीएने दिले आहे. तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि दुसऱ्या बाजूस असलेले अन्य कायमस्वरूपी बांधकाम यामध्ये कुर्ला टर्मिनल मेट्रो स्थानक प्रस्तावित होते. तसेच येथे प्रवाशांच्या प्रवेशासाठी सुयोग्य स्थिती नसल्याचे कारण एमएमआरडीएने दिले आहे. तर कलानगर उड्डाणपुलाचा रॅम्प आणि एमएमआरडीए कार्यालय स्थानक एकमेकास प्रतिकूल असल्याने ते स्थानक वगळले असून आयकर मेट्रो स्थानक २२० मीटरने कुटुंब न्यायालयाच्या दिशेस स्थलांतरित केल्याचे एमएमआरडीएने सांगितले.

एमएमआरडीएच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार डीएन नगर ते मंडाले या मेट्रो मार्गिकेवर एकूण २२ मेट्रो स्थानके आहेत. त्यामध्ये १४ वे स्थानक म्हणून कुर्ला टर्मिनलचा उल्लेख आहे. तसेच मेट्रो २ बी मार्गिकेस मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ ए (डीएन नगर-अंधेरी), मेट्रो ३ (कुलाबा-सीप्झ), मेट्रो ४ (कासारवडवली ते वडाळा) आणि सध्याची मोनोची रेल्वे या चार ठिकाणी आंतरजोडणी असेल. मेट्रो २ बी मार्गिकेवरील दोन कंत्राटदारांनी कामात दिरंगाई केल्याबद्दल एमएमआरडीएने फेब्रुवारीत नारळ दिला. त्याचबरोबर मंडाले येथील मेट्रो डेपोच्या कामाबद्दलही कंत्राटदाराने दिरंगाई केली होती.

प्राधिकरणाकडे आक्षेप

कुर्ला स्थानक वगळल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे आक्षेप नोंदविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांस पत्र पाठवून हे स्थानक न वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे. मेट्रो २ बी मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी असून कुर्ला टर्मिनल हे स्थानक सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानक वगळण्यापूर्वी जनतेच्या हरकती आणि आक्षेप मागविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.