शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची भेट नुकतीच झाली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोच आहे. इतकेच नाही तर छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्यामुळे राजकीय तर्कांनाही उधाण आले आहे. या दोघांची भेट आणि त्यांच्यात रंगलेल्या गप्पा हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
एक काळ असा होता की शिवसेना म्हणजे छगन भुजबळांची आक्रमकता.. मात्र त्यांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेब ठाकरे त्यांचा उल्लेख लखोबा म्हणून करत. शिवसैनिकांनी तर त्यांच्या नावापुढे गद्दार असे विशेषणच जोडले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यातही उभा दावाच निर्माण झाला होता. मात्र अनेक वर्षांनी हे मतभेद मागे सारत हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. छगन भुजबळांना तुरुंगात जावे लागले तेव्हा शिवसेनेने त्यांच्या बाबत सहानुभूतीही व्यक्त केली होती.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नात या दोन्ही नेत्यांसह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी होती. मात्र चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचीच. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊतही होते. या दोघांनी कोणत्या विषयावर गप्पा मारल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र त्यांच्या या भेटीमुळे आणि दिलखुलास गप्पांमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी सामनातून तुमची बाजू घेतली त्याबाबत भुजबळ यांना विचारले होते त्यावेळी त्यांनी आमचे ऋणानुबंध आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली होती. आता या दोघांच्या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 5:58 pm