राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचा सत्तेतील सहभाग निश्चित होताच आता शिवसेनेचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सत्तेच्या राजकारणातील वजनदेखील वाढले आहे. आज दुपारी सह्य़ाद्री अतिथिगृहातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सेनेच्या सत्तासहभागाची घोषणा करीत होते, त्याच वेळी ‘राजभवन’वर उद्धव ठाकरे सहकुटुंब राज्यपालांचा पाहुणचार घेत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारक प्रकल्पास गती देण्यासाठी आजच राज्य शासनाने एक समितीदेखील स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या अस्मितांवर हळुवार फुंकर घालत भाजपने अखेर सेनेला आपलेसे केल्याचे मानले जात आहे.
मलबार हिल येथील ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या सत्तासहभागाची घोषणा केली, तेव्हा शिवसेनेचे सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते त्यांच्यासोबत होते, तर बाजूच्याच राजभवनवर उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य व तेजस हे दोघे पुत्र राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी आयोजित केलेल्या भोजनाचा आस्वाद घेत होते.
 उद्धव ठाकरे यांची ही सहकुटुंब सदिच्छा भेट होती, असे ‘राजभवन’च्या सूत्रांनी सांगितले. राज्यपालांच्या पत्नीदेखील या भोजनप्रसंगी उपस्थित होत्या. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ‘फटकारे’ हे पुस्तक भेटीदाखल दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून ओढलेल्या आसूडांचा या पुस्तकात संग्रह आहे.