उद्धव ठाकरे यांचा आमदार, पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : नुसत्या घोषणा म्हणजे वचनपूर्ती नाही, जी घोषणा झालेली आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदारांना दिला. त्याचबरोबर ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ हे शेतकऱ्यांना अडवणूक करणाऱ्यांना दाखवायचे आहे, असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. चारा छावण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या पोटापाण्याची सोय शिवसेनेने केली. आपली जनता ही मुकी-बहिरी नाही, सहनशील आहे. शिवसेना सत्तेत असूनदेखील जनतेसोबत राहिली. लोकांना आपला प्रामाणिकपणा भावला म्हणून लोकांनी  मतदान केले, असे ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांचे मुद्दे अमित शहा , देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आणि त्याबद्दलची कार्यवाही सुरू झाली आहे. जनतेला माहिती आहे की  संकट आले तर शिवसैनिक मदतीला धावून येतील. शिवसैनिक शेतकऱ्यांसोबत आहेत हा संदेश गेला पाहिजे. जनतेला न्याय शिवसेना देणार, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.