आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा आग्रही आहे. पण शिवसेनेने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेकडून सातत्याने भाजपावर जोरदार टीका सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील शाखेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी त्याच इमारतीमधील एका हॉटेलमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा केली. या भेटीत आगामी निवडणुकीत युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. कारण ही भेट काही मिनिटांचीच होती असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून त्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशन कालावधीत शिवसेनेने सभागृहात सरकारला अडचणीत आणणारी भूमिका घेऊ नये असा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. याआधी वेगवेगळया व्यासपीठांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना युती झाली पाहिजे. शिवसेना वैचारिक मित्र असल्यामुळे युतीमध्ये दोन्ही पक्षांचा फायदा आहे असे जाहीरपणे सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पण शिवसेनेने युती संदर्भात अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.