‘प्रीमिअम’द्वारे ३५ टक्के फंजिबल चटई क्षेत्रफळ; शेकडो इमारतींतील रहिवाशांना दिलासा

फ्लॉवर बेड, निश, बाल्कनी आदी सदनिकेशी संबंधित असलेला भाग सदनिकेत अंतर्भूत केल्यानंतर चटई क्षेत्रफळाचे उल्लंघन केल्यामुळे पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या मुंबईतील शेकडो इमारतींतील रहिवाशांना नव्या विकास आराखडय़ामुळे दिलासा मिळणार आहे. नव्या विकास नियंत्रण नियमावलीत अशा इमारतींना ३५ टक्के फंजिबल चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. रेडी रेकनरच्या ६० टक्के इतक्या दराने हे चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार असून त्याचा वापर करून या रहिवाशांना आपल्या सदनिकेअंतर्गत केलेले बदल वा इतर बांधकाम अधिकृत करून घेता येणार आहे.

नव्या विकास नियंत्रण नियमावलीतील या सवलतीचा फायदा प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील उत्तुंग इमारतींना होणार आहे. या इमारतींतील बहुतांश सर्वच सदनिकाधारकांनी अशा रीतीने चटई क्षेत्रफळात न येणारा भाग सदनिकेत अंतर्भूत केला आहे. ही बांधकामे अनधिकृत असल्याबाबत पालिकेनेही नोटिसा बजावल्या होत्या. आता या इमारतींना ३५ टक्के फंजिबल चटई क्षेत्रफळ प्रीमिअम भरून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची ही बांधकामे अधिकृत होतील, असे पालिकेशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी फ्लॉवर बेड, निश, बाल्कनी आदी चटई क्षेत्रफळात गृहीत धरले जात नव्हते. ६ जानेवारी २०१२ नंतर मात्र ते चटई क्षेत्रफळअंतर्गत गृहीत धरण्यात आले आणि यासाठी फंजिबल चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात आले. मात्र फक्त नव्या प्रस्तावांनाच तो नियम लागू होता. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींतील अशी बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली होती. नव्या नियमावलीत ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी फंजिबल चटई क्षेत्रफळाचा लाभ देण्यात आला आहे. अशा इमारतींनी उपलब्ध चटई क्षेत्रफळापेक्षा अधिक वापर केल्यामुळे त्यांचा पुनर्विकासही रखडला होता. आता या इमारतींना फंजिबल चटई क्षेत्रफळाचा लाभ घेऊन इमारतीचा पुनर्विकास करता येणार आहे. यामुळे प्रीमिअमच्या रूपाने पालिकेच्या तिजोरीतही भर पडणार आहे.

‘फंजिबल’ चटई क्षेत्रफळ म्हणजे काय?

फ्लॉवर बेड, निश, बाल्कनी, लॉबी आदींसाठी जे चटई क्षेत्रफळ वापरले जाते त्याला फंजिबल चटई क्षेत्रफळ असे संबोधले जाते. इमारतीतील हा भाग ६ जानेवारी २०१२ पूर्वी चटई क्षेत्रफळांतर्गत गृहीत धरला जात नव्हता. त्यानंतर त्यासाठी ३५ टक्के फंजिबल चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात आले.