‘हट्टाग्रही कारभारा’ने विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरूच

मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत जाहीर केलेल्या निकालांमधील चुका निस्तरताना विद्यार्थ्यांच्या अक्षरश: नाकीनऊ  आले आहेत. निकाल जाहीर करण्याच्या गडबडीत ज्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना सरळ गैरहजर असल्याचा शेरा मारून त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे समोर येत आहे. तेव्हा आता या विद्यार्थ्यांनाच आपण हजर असल्याचे पुरावे गोळा करत फिरण्याची वेळ आली आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबई विद्यापीठामध्ये निकाल राखीव असलेल्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी मदत केंद्रावर गर्दी केली होती. त्यांना येत्या २८ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या निकाल रखडपट्टीवर ताशेरे ओढत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश विद्यापीठाला दिले होते. या आदेशानंतर निकाल जाहीर करण्यासाठी जी घाई विद्यापीठाने केली त्यात मात्र हजारो विद्यार्थी भरडले गेले आहेत. जाहीर झालेल्या निकालांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.  या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन तरी झालेले नाही किंवा त्यांच्या उत्तरपत्रिका तरी गहाळ झाल्या आहेत. म्हणूनच खरेतर त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र असे स्पष्ट न सांगता परीक्षेला गैरहजर दाखविण्याची किंवा त्यांचे सत्राचे गुण मिळाले नसल्याची कारणे देत त्यांचे निकाल रखडवून ठेवण्यात आले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना निकाल मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

मिठीबाई महाविद्यालयातील कला शाखेच्या दोन विद्यार्थिनींनी याच पद्धतीने निकाल राखीव ठेवण्यात आल्याची तक्रार केली आहे. विद्यापीठाकडे चौकशी केली असता दोघींनाही समाजशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.

‘आम्ही पेपरला हजर असूनही गैरहजर दाखविले आहे. चौकशीसाठी विद्यापीठाच्या मदत केंद्रावर गेलो असता त्यांनी एक अर्ज देऊन तो महाविद्यालयातून भरून आणण्यास सांगितले. अर्ज भरून विद्यापीठात गेलो तर हा अर्ज आधीच्या सत्रांमध्ये केटी लागली आहे का ते समजण्यासाठीचा होता. त्यानंतर आम्हाला एका पेपरला गैरहजर असल्याचे सांगण्यात आले. तसेच, तुम्ही हजर आहात हे सिद्ध करण्यासाठी जिथून परीक्षा दिली त्या केंद्रातून तसा अहवाल आणण्यास फर्मावले आहे. हजेरीच्या अहवालासाठी केंद्रावर गेलो तर तिथेही त्यांनी पुढच्या आठवडय़ात यायला सांगितले आहे. आम्ही चांगले पेपर लिहूनही निकाल मिळवण्यासाठी आता आम्हीच सगळीकडे धावपळ करायची, हा कोणता न्याय आहे. आम्ही हजर आहोत का याची विद्यापीठ स्वत: पडताळणी करू शकते. त्याऐवजी आम्हाला नुसत्या चकरा मारायला लावल्या जात आहेत,’ अशी तक्रार एका विद्यार्थिनीने केली. याच महाविद्यालयाच्या कला शाखेच्या एका विद्यार्थ्यांला तर सर्वच विषयात गैरहजर असल्याचे सांगत विद्यापीठाने निकाल राखीव ठेवला आहे.

विद्यापीठावर खोटारडेपणाचा आरोप

मुंबईच्या उपनगरातील एका महाविद्यालयाच्या कला शाखेच्या १५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यामधील काही विद्यार्थ्यांनाही गैरहजर दाखविण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांबाबत आधीच्या म्हणजेच पाचव्या सत्राचे गुण महाविद्यालयाकडून मिळाले नसल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र हे कारणही पोकळ असल्याचा महाविद्यालयांचा आरोप आहे. ‘आधीच्या सत्रांचे गुण दिलेले नाहीत असे विद्यापीठाकडून चक्क खोटे सांगितले जात आहे. आमच्या एका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन झाले नसल्याचे ऑनलाइन दिसत होते. पाचव्या सत्राचे गुण मिळाले नाहीत तर उर्वरित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका विद्यापीठाने आज आमच्याकडे कशा पाठविल्या,’ असा सवाल या महाविद्यालयाच्या प्राचार्यानी केला.

‘विद्यापीठाकडे एकच तक्रार’

‘विद्यार्थी हजर असूनही गैरहजर दाखविले असल्याची तक्रार एका विद्यार्थ्यांने केली आहे. आतापर्यंत केवळ एकच अशी तक्रार विद्यापीठाकडे आलेली आहे. याबाबत हजेरीपट पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पाचव्या सत्राचे गुण मूल्यांकनाचे काम दिलेल्या कंपनीकडून मिळण्यास उशीर होत असल्याने काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे.