25 November 2020

News Flash

उंबरठय़ाआडही असुरक्षितच!

सार्वजनिक ठिकाणी बलात्कार, छेडछाड, विनयभंग अशा महिलांवरील अत्याचारांच्या बातम्यांनी वातावरण काळवंडून गेले असतानाच कुटुंबातही महिला हिंसाचाराला सामोरे जात असल्याच्या दोन घटना बुधवारी मुंबापुरीत घडल्या.

| December 20, 2012 05:31 am

सार्वजनिक ठिकाणी बलात्कार, छेडछाड, विनयभंग अशा महिलांवरील अत्याचारांच्या बातम्यांनी वातावरण काळवंडून गेले असतानाच कुटुंबातही महिला हिंसाचाराला सामोरे जात असल्याच्या दोन घटना बुधवारी मुंबापुरीत घडल्या. आपल्या संसारात सासू विघ्ने आणते या भावनेने पेटलेल्या जावयाने हातातील कात्रीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात सासू गतप्राण झाली. तर दुसऱ्या घटनेत नवऱ्याने केलेल्या ब्लेडच्या हल्ल्यात पत्नी रक्तबंबाळ झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले गेल्याने सुदैवानेच ती जिवानिशी वाचली. अनोळखी पुरुषांपासून बचाव करण्याच्या अनेक उपाययोजना आखल्या जात असताना ओळखीच्या अथवा नात्यातील पुरुषांपासून स्वसंरक्षणाचा मात्र अद्याप कोणताही उपाय सापडलेला नाही.  

पत्नीवर भररस्त्यात ब्लेडने हल्ला
विद्याविहार स्थानकाबाहेर एका महिलेवर तिच्या पतीने ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली. जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर पतीला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अनुसया पवार (३६) असे या महिलेचे नाव असून ती भांडूप येथे राहते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. गेल्या पाच वर्षांपासून याच भागात राहणाऱ्या विजय पवार याने तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवले व गेल्याचवर्षी तिच्याशी लग्न केले. परंतु, लग्नानंतरही तो अनुसयाला त्रास देत असे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून आपल्या दोन्ही मुलांसह ती वेगळी रहात होती. बुधवारी दूपारी ती विद्याविहार स्थानकाबाहेर साफसफाईचे काम करत असताना विजयने येऊन तिला धमकावले. तेव्हा ती त्याला टाळून पुढे जात असतानाच त्याने स्वत:जवळील ब्लेडने तिच्या गळय़ावर वार केले.     

बोरीवलीत जावयाकडून महिलेची हत्या
पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवून संसारात विघ्न आणत असल्याच्या संशयातून बोरिवलीत एका तरुणाने आपल्या सासूची हत्या केली. मंजू स्वामी (५५) असे या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. बोरीवलीच्या सेंट अंथोनी रोडवरील चामुंडा सर्कल येथील ट्रांजिस्ट कॅम्पमध्ये चाळीत मुरगेश मुत्तू (३२) हा आपल्या पत्नीसह रहात होता. तो टेलरिंगचे काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे पत्नीशी खटके उडत होते. यामागे सासूच असल्याचा त्याला संशय होता. याच मुद्यावरून बुधवारी रात्री ९ च्या सुमारास त्याचे सासूशी भांडण झाले. त्यावेळी  रागाच्या भरात त्याने सासूच्या हातात कैची घुसवली. रक्तस्त्राव झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात हाताची नस कापली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बोरीवली पोलिसांनी आरोपी मुरगेश याला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ महेश पाटील यांनी दिली.    

दिल्ली बलात्कार : आणखी एकास अटक
नवी दिल्ली : चालत्या बसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी आणखी एकाला बिहारमधून अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील विनय शर्मा या आरोपीने आपल्याला फाशी द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली. सर्व आरोपींवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2012 5:31 am

Web Title: unsecured in back of threshold
टॅग Ladies
Next Stories
1 शिवस्मारकासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू
2 पेंढरकर महाविद्यालयात संस्था अध्यक्षांची हुकूमशाही
3 चौथरा हटवला, पण ‘गुप्त योजना’ बारगळलीच!
Just Now!
X