हार्दिक पटेलचा विश्वास

समाजमाध्यमे ही खूपच प्रभावी आहेत. त्यांच्यामुळे एखादा संदेश १५ सेकंदांत २५ लाख लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक यांचा योग्य पद्धतीने वापर करून समाजमाध्यमांवर एखादी चळवळ किंवा आंदोलन आपण उभे करू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा आता ट्विटर जास्त शक्तिशाली व प्रभावी माध्यम आहे. समाजमाध्यमांच्या जोरावर आपण लोकांमध्ये जागृती व उठाव करून भाजप सरकारला उलथवून टाकू शकतो, असा विश्वास गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने व्यक्त केला आहे.

हार्दिक पटेल गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागातील पथकाशी संवाद साधण्यासाठी मुंबईत आला होता. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या समाजमाध्यम पथकातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप सरकार वर्षांला २०० ते ३०० कोटी रुपये फक्त समाजमाध्यमांवर खर्च करते. याच समाजमाध्यमांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. हीच समाजमाध्यमे एखाद्याला पंतप्रधान बनवू शकतात, तर याच समाजमाध्यमांच्या जोरावर भाजप सरकारला येत्या निवडणुकीत पाडता येऊ शकते, असे हार्दिकने सांगितले. मी काँग्रेसी नाही, परंतु काँग्रेसला मदत व पाठिंबा देणार आहे. यासाठी मी वारंवार मुंबईत येत राहणार आहे असे हार्दिकने सांगितले.