मुंबई : करोना लशीच्या दोन मात्रा प्रवाशांनी घेतल्या आहेत की नाही, याची पडताळणी करून क्यू आर कोड देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने करावी, असे प्रतिपादन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केले. राज्य सरकारने निर्णयाआधी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यासाठी अ‍ॅपवर प्रमाणपत्र पडताळणी करून क्यू आर कोड दिला जाईल व तो रेल्वे पासावर असेल, असे सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या लशींच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची यंत्रणा रेल्वेकडे नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारलाच ही यंत्रणा राबवावी लागणार आहे. विमानतळाबाहेर राज्य सरकार व महापालिका यंत्रणाच लस प्रमाणपत्रांची पडताळणी करते. त्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांच्या प्रमाणपत्रांची पडताळणीही राज्य सरकारने करावी, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

भाजपचा विरोध

भाजपने या क्यू आर कोड आधारित प्रणालीला विरोध केला आहे. लशीचे प्रमाणपत्र व ओळखपत्र पाहून रेल्वेच्या तिकीट खिडकीवर प्रवाशांना पास अथवा तिकीट उपलब्ध झाले पाहिजे. या अटींना भाजपने विरोध केला असून राज्य सरकारचा लोकल प्रवासाची परवानगी लांबविण्याचा डाव असल्याचा आरोप मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.