वितरकांसाठी कर्जाच्या परतफेड मुदतीत वाढ

वाहननिर्मिती क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यासाठी देशातील अग्रणी स्टेट बँकेने काही पावले उचलायचे ठरवले आहे. यात विशेषत: वितरकांना सणासुदीच्या तोंडावर घाऊक प्रमाणात वाहने विकत घेता यावीत यासाठी कर्ज परतफेडीचा कालावधी १५ ते ३० दिवसांनी वाढवून देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. यासंदर्भात आमची वितरकांशी बोलणी सुरू असून, प्रत्येकाला अडचणीतून बाहेर काढण्याचा आमचा इरादा आहे, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले.

साधारण परतफेडीचा कालावधी ६० दिवसांचा असतो. तो आम्ही काहींच्या बाबतीत ७५ ते ९० दिवसांपर्यंत वाढवून देत आहोत, असे गुप्ता यांनी सांगितले. वैयक्तिक वाहन खरेदी इच्छुकांसाठीही तत्परतेने कर्ज उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अशा प्रकारे कर्जपुरवठा केल्याने थकीत कर्जामध्ये वाढ होणार नाही, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला. स्टेट बँकेने वाहन वितरकांसाठी आतापर्यंत ११,५०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केलेले आहे.

आमच्याकडे कर्जे उपलब्ध आहेत, मात्र मागणी वाढावी यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी सांगितले. पात्रता पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ऋणकोला आमचे शाखा व्यवस्थापक कर्ज नाकारणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रवासी आणि मालवाहू अशा दोन्ही वाहन प्रकारांतील जवळपास २० वर्षांतील नीचांकी विक्री यंदा जुलै महिन्यात नोंदवली गेली होती. वाहनांना उठाव नसल्यामुळे वाहननिर्मिती आणि संलग्न उद्योगातील हजारो कामगारांवर मंदीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका आहे.

मागणीसाठी सरकारी रेटाच आवश्यक – रजनीश कुमार

  1. कर्जाची मागणी अद्याप मंदावलेलीच असून, अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी रविवारी सांगितले.
  2. मात्र मागणीमध्ये वाढ होण्यासाठी सरकारी धोरणांचीच आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांजवळ पुरेसे भांडवल आहे आणि बँकांच्या कर्जाचे व्याजदरही नियंत्रित आहेत, असे कुमार यांनी सांगितले.
  3. या वर्षी मोसमी पावसाचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा कुमार यांनी व्यक्त केली. सरकारने खर्चात केलेली वाढ आणि आगामी सणासुदीचे दिवस यामुळे मागणी वाढेल असे ते म्हणाले.