|| सुशांत मोरे

पोस्टमनला मनस्ताप, वाहन चालकांची आरटीओकडे पायपीट

चुकीचा पत्ता, घर बदलणे या आणि अशा अन्य कारणांमुळे टपाल खात्याकडून पाठविण्यात आलेले आरसी बुक (वाहन नोंदणी प्रमाणपत्र) आणि परवाना पुन्हा टपाल खात्याकडेच परत आल्याचे प्रकार वारंवार घडत आहे.

त्यामुळे ही कामे करणाऱ्या पोस्टमनला तर मनस्ताप होतोच शिवाय वाहन चालकांना ही कागदपत्रे मिळविण्यासाठी पुन्हा आरटीओकडे धाव घ्यावी लागत आहे. एप्रिल २०१८ ते जुलै २०१८ पर्यंत राज्यातील असे एकूण ९२ हजार ९७० वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि लायसन्स पुन्हा टपाल खात्याकडे आले आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबई क्षेत्रातून ३४ हजार ८८६ वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि लायसन्सचा समावेश आहे. त्यानंतर नवी मुंबई आणि पुणे क्षेत्राचा नंबर लागत असल्याची माहीती मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयाकडून देण्यात आली.

आरटीओत येऊन कायमस्वरूपी लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तासंतास वेळ घालवावा लागत असल्याने ते टपाल खात्यामार्फत घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहन चालक किंवा मालकाचा बराचसा वेळा वाचतो. या कामासाठी आरटीओकडून टपाल खात्याला प्रत्येक पार्सलमागे ४५ रुपये दिले जातात. मात्र ही सेवा दिल्यानंतरही काही वाहन चालक आणि मालकांना त्यांच्याच चुकांमुळे वाहन नोंदणी प्रमाणपत्र किंवा लायसन्स मिळू शकत नाही.

घराचा योग्य पत्ता नसणे, चालक-मालक घरी उपलब्ध नसणे, अन्यत्र घर घेणे किंवा भाडेतत्त्वावर असलेले घर बदलणे अशा काही कारणांमुळे आलेले नोंदणी प्रमाणपत्र आणि लायसन्स पुन्हा टपाल खात्याकडे जाते. त्यानंतर टपाल खात्याकडून ही कागदपत्र आरटीओकडे पाठविली जातात आणि वाहन चालकाला प्रमाणपत्र तसेच लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओपर्यंत पुन्हा पायपीट करावी लागते. यामुळे पोस्टमनलाही मनस्ताप सहन करावा लागतो.

एप्रिल २०१८ ते जुलै २०१८ पर्यंत टपाल खात्याने गोवा क्षेत्र, मुंबई क्षेत्र, नागपूर क्षेत्र, नवी मुंबई आणि औरंगाबाद क्षेत्रातून दोन लाख २१ लाख ४५ हजार ८७६ वाहन नोंदणी प्रमाणपत्र व लायसन्स वाहन चालक-मालकांना घरपोच दिले असता यातील ९२ हजार ९७० लायसन्स व प्रमाणपत्र पोस्टमनकडून पुन्हा टपाल खात्याकडे जमा केल्याचे मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले.

यामध्ये चार महिन्यात मुंबई क्षेत्रातूनच (मुंबई पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, उत्तर-पूर्व)३४ हजार ८८६ लायसन्स व प्रमाणपत्र विविध कारणांमुळे पुन्हा टपाल खात्याकडे आली. त्यानंतर नवी मुंबई क्षेत्रातूनही (अलिबाग, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, मालेगाव) २२ हजार ९४९ आणि पुणे क्षेत्रातूनही (अहमदनगर, श्रीरामपूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे शहर व ग्रामिण) २० हजार ४१८ प्रमाणपत्र व लासयन्स टपाल खात्याकडे परत आले आहेत. याचबरोबर औरंगाबाद, नागपूर आणि गोवा क्षेत्रातूनही आरटीओची कादगपत्रे पुन्हा टपालाकडे येण्याचे प्रमाण आहे.