News Flash

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकसत्ता’चे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांचं निधन

निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती

टिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे.

समाजसंस्कृती आणि इतिहासाचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत  आणि ‘लोकसत्ता’चे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. टिकेकर यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. जवळपास एक दशकाहून अधिक काळ त्यांनी ‘लोकसत्ता’चे संपादकपद भूषवले. लोकसत्ताला नवं रूप देण्यात टिकेकरांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत ‘लोकसत्ता’ दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव परिचित आहे. पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. टिकेकरांनी ‘लोकसत्ता’च्या प्रत्येक पुरवणीची एक वेगळी ओळख निर्माण करून त्यांचा बाज बदलला. लोकसत्तेतील त्यांचे ‘तारतम्य’ आणि ‘जन-मन’ हे स्तंभ खूप गाजले. केवळ लिखाण नव्हे; तर पत्रकारितेच्या पेशाची तांत्रिक बाजू, त्याचे व्यवस्थापन याची त्यांना सखोल माहिती होती. एका अभ्यासू पत्रकाराच्या पलीकडे ग्रंथप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या स्वत:च्या संग्रही प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा होती.

डॉ.अरूण टिकेकरांचे प्रकाशित साहित्य
अक्षरनिष्ठांची मांदियाळी
ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
काल मीमांसा
फास्ट फॉरवर्ड (शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
रानडे प्रबोधन-पुरुष
शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव
स्थल काल
ऐसा ज्ञानगुरू
बखर मुंबई विद्यापीठाची

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2016 11:22 am

Web Title: veteran journalist aroon tikekar passed away
Next Stories
1 महापालिकेच्या मैदानांची ‘उचलेगिरी’ करणाऱ्या शाळा पेचात
2 ‘करून दाखविले’चे श्रेय सेनेचे.. अपश्रेय मात्र आयुक्तांचे!
3 प्रदूषण रोखण्यासाठी समांतर सागरी मार्गावर ८२ हेक्टर जागेवर बगिचा बहरणार
Just Now!
X