ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईतील सुजय रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खय्याम यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि नऊ दूरदर्शन मालिकांना संगीत दिले होते. त्यांच्या एकूण गाण्यांची संख्या ६४२ इतकी होती. यात सुमारे २२० गैरफिल्मी गीतांचा समावेश होता – ज्यात त्यांनी बेगम अख्तर, रफी, मुकेश, तलत, आशा, महेन्द्र कपूर, सुधा मल्होत्रा, सुलक्षणा पंडित, भूपिंदर सिंग आणि हेमलता यांच्याकडून गाऊन घेतली होती. त्यांनी मोहम्मद रफी यांच्याकडून काही भजनंही गाऊन घेतली. खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. २०१० मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं.