|| प्रसाद रावकर

मतदान घटल्याचे खापर ‘आयारामां’वर :- शिवसेना, युवासेना, पक्षात नव्याने दाखल झालेले नेते, आदित्य ठाकरे यांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले राजकीय पंडित आदी विविध घटक एकाच वेळी वरळीत सक्रिय राहूनही वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यात पक्षाला यश आलेले नाही. उलट मागील निवडणुकीच्या तुलनेत ५.५५ टक्क्यांनी मतदान कमी झाले. त्यामुळे प्रचाराची धुरा सोपवलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आयारामां’वर टीका करायला सुरुवात केली आहे. तर युवासेनेचे पदाधिकारी मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत.

ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणी तरी प्रथमच निवडणूक लढवत असल्याने मतदारांना मोठय़ा संख्येने मतदानाकरिता उतरविण्याचा पक्षाचा प्रयत्न होता. परंतु विविध घटक एकाच वेळी कार्यरत राहिल्याने वरळीतील प्रचारात सुसूत्रता येण्याऐवजी सुरुवातीपासूनच गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे आदित्य यांच्या चौक सभा, प्रचार सभा रद्द करण्याची वेळ आली होती. याच गोंधळामुळे मतदानासाठी मतदारांना उतरवण्यात पक्षाला अपयश आले. या अपयशाचे खापर आपल्यावर फुटू नये यासाठी प्रत्येक पदाधिकारी आता  धडपडतो आहे.

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे जाहीर होताच वरळी, परळ आणि आसपासच्या परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेचे बडे नेते वरळीमध्ये हजेरी लावतील आणि प्रचाराच्या तोफा धडधडतील, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांबरोबरच वरळीकरांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही.

येथील प्रचाराची धुरा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर होती. त्यात विद्यमान आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, नगरसेवक आशीष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर आदींचा समावेश होता. त्याचबरोबर निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी एका संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतदानापर्यंतच्या काळात या सर्वाच्या समन्वयाने प्रचार होईल अशी ‘मातोश्री’ला अपेक्षा होती. परंतु प्रचाराची जबाबदारी सोपविलेल्या स्थानिक नेत्यांमधील विकोपाला गेलेले वाद, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्यांचे वर्चस्व वाढू नये यासाठी धडपडणारे नेते, युवा सैनिकांमधील समन्वयाचा अभाव आणि संस्थेचे चुकलेले आडाखे आदीमुळे गोंधळच उडाला. त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी दिसत होता.

मतदान केंद्रावर गर्दी दिसत नसल्यामुळे घरोघरी फिरून मतदारांना मतदानासाठी जाण्याचे आवाहन करावे, असे वारंवार सेना भवनमधून स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात येत होते. मात्र मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात नेते, पदाधिकारी कमी पडल्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याची चर्चा सोमवारी रात्री वरळीमध्ये सुरू होती. नेते मंडळींचे हात वर विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघात ५५.७५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ते ५०.२० टक्क्यांवर आले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यात ५.५५ टक्क्यांनी घट झाली आहे. उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याची सबब पुढे करून नेते मंडळी हात झटकू लागले आहेत.