कुठे उत्साह, कुठे नोटा तर कुठे उदासीनता

मुंबईत मतदानाबाबत एकूणच निरूत्साह असला तरी तरूण वर्ग मात्र मोठय़ा प्रमाणात सहभागी झाला होता. अनेक तरुणांनी शाई लावलेल्या बोटासोबत काढलेला सेल्फी समाज माध्यमांवर पोस्ट करुन ‘आम्ही मतदान के लं. आपण कधी करणार?’ या शीर्षकाचा जोरदार प्रचार के ला. मतदानाबत आग्रही असलेल्या काही तरुणांनी विभागातील समस्या आणि उमेदवारांचा अभ्यास करून मतदान के ले, काहींनी नोटाचा पर्याय निवडला. तर अनेकांनी मत वाया जायला नको म्हणून उमेदवार पसंतीचा नसला तरी मतदान के ल्याचेही दिसून आले.

या विषयी श्वेता केणी सांगते, मतदान करताना अभ्यास करणे हे तरुणांसाठी गरजेचे आहे. आपल्या विभागातील होऊ न गेलेले लोकप्रतिनिधी, त्यांचे कामे आणि आता निवडणकीत उतरलेले उमेदवार, त्यांचे शिक्षण, कामे याचा विचार होणे गरजेचे आहे. देशात निवडल्या जाणाऱ्या एखाद्या बलाढय़ पक्षाचा स्थानिक उमेदवार योग्य नसेल तर के वळ पक्षाकडे पाहून त्याला मतदान करणे योग्य नाही. पक्ष कोणताही असला तरी तरुणांनी मात्र सारासार विचार करायला हवा. कदाचित विभागातील नवखा उमेदवारही तुमच्या प्रश्नांना अधिक न्याय देऊ  शकतो. असे श्वेता सांगते. तर नोटा हा पर्याय उमेदवारांबाबत उदासीनता दाखवण्याचे उत्तम साधन असल्याचे मयुरी धुमाळ सांगते. तिच्या मते विभागातील प्रश्न आणि उमेदवार पाहता अनेकदा एकही उमेदवार सुयोग्य वाटत नाही. कधी विचारधारेचा प्रश्न असतो तर कधी उमदेवारांनी न के लेल्या कामाचा. अशा वेळी कु णालाही मत देण्यापेक्षा नोटाच्या माध्यमातून उमेदवारांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करता येते. म्हणून मतदान न करण्यापेक्षा आपली नाराजी विशद करावी. यातून जर नोटाचा टक्का वाढला तर पुढच्या काळात उमेदवार देताना पक्षांसाठीही त्या अप्रत्यक्ष सूचना ठरतील. असे ती सांगते.

अभ्यासू मतदार आणि नोटा निवडणाऱ्यांचा टक्का मोठा असला तरी मतदानाबाबत उदासीनता व्यक्त करणाराही मोठा गट आहे. याविषयी साम्या कोरडे सांगते, मतदान करण्याबाबत आम्ही तरुण आग्रही असलो तरी  बऱ्याचदा मतदान करून समाधान मिळतेच असे नाही. जेव्हा विभागातील एकही उमेदवार सक्षम नसतो, आणि नोटा हा पर्याय मनाला पटत नाही अशावेळी ‘याला नाही तर त्याला‘ किं वा ‘त्यातल्या त्यात हा बरा‘ हे धोरण ठेऊ न एका उमेदवाराला मत द्यावे लागते. पण आपण योग्यच उमेदवार निवडला का याबाबत मात्र शंका वाटत राहते. अशी उदासीनता आज अनेक तरुणांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. ‘देश पातळीवरचे राजकारण, युती, आघाडी काहीही असले तरी स्थानिक राजकारणाचा विचार करताना मात्र समीकरण बदलून जाते. त्यामुळे सत्ताधारी पटत नाहीत, विरोधी सक्षम नाहीत म्हणून ही उदासीनता आहे‘. असेही साम्या सांगते.