18 February 2019

News Flash

पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नाही!

अवांतर वाचन पुस्तकांबाबत विनोद तावडे यांचा दावा

शिक्षणमंत्री विनोद तावडे ( संग्रहीत छायाचित्र )

अवांतर वाचन पुस्तकांबाबत विनोद तावडे यांचा दावा; विरोधकांचे आरोप फेटाळले

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केला. विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या आधारे खोटे आरोप केल्याचे सांगत तावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकात आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर असल्याचा तसेच या पुस्तकांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्याबद्दल बोलताना विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकामध्ये कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या पुस्तकांचे अद्यापही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करून तावडे म्हणाले की, महाराष्ट्र विद्या प्राधिकारण, पुणे यांच्यामार्फत पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत नेमण्यात आलेल्या आशय समितीकडून या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे. विरोधकांनी जे पुस्तक काल दाखविले ते पुस्तक जुने असून ते कुंभमेळ्यामध्ये वाटण्यात आले होते. त्या पुस्तकांतील मजूकर विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या बाल नचिकेता या पुस्तकामध्ये समाविष्ट नसल्याचेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करण्याची विरोधकांना सवयच झाली असल्याचा टोलाही तावडे यांनी लगावला.

भारतीय विचार साधनाकडून २० रुपयांची पुस्तके ५० रुपये किमतीने खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा आरोप खोडून काढताना जी पुस्तक २० रुपये दराने मिळत आहेत ती ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ व लहान आकारात असून या पुस्तकाची छपाई साध्या कागदावर करण्यात आलेली आहे; तर ५० रुपयांची पुस्तके ही मोठय़ा आकाराची असून त्यासाठी आर्ट पेपरचा व अधिक जाडीचा जीएसएमचा कागद वापरण्यात आलेला आहे. ही पुस्तके रंगीत व फोर कलरची आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘तो’ दावाही निराधार

एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत समितीने निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती राजा शिवाजी महाराज यांची सुमारे ३ लाख ५० हजार पुस्तके, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या जीवनावरील सुमारे २ लाख पुस्तके, छत्रपती शाहू महाराज यांची सुमारे २ लाख पुस्तके यांच्यासह स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांच्यासह संत कबीर, संत मीराबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदींची ही पुस्तके समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शीर्षकाची लाखो पुस्तके खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा दावा निराधार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

First Published on February 15, 2018 1:35 am

Web Title: vinod tawde comment on book scam