राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नियम डावलून २०६ कोटी रुपयांची कंत्राटे दिल्यावरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सुद्धा नियम डावलून दरकरार पद्धतीने खरेदीला मान्यता दिल्यावरून वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. १९१ कोटी रुपयांच्या खरेदीचे कंत्राट दरकरार पद्धतीने दिले गेल्याने तावडे अडचणीत आले आहेत.
राज्यातील ६२,१०५ जिल्हा परिषद शाळांसाठी अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्यासाठी तावडे यांनी ११ फेब्रुवारी २०१५ रोजी शासकीय आदेश जारी करून शिक्षण संचालकांना(प्राथमिक) दर करार पद्धतीने ही खरेदी करण्याचे आदेश दिले. एका अग्निशमन यंत्राची किंमत ८३२१ रुपये इतकी असून, प्रत्येक शाळेला तीन अग्निशमन यंत्रे देण्यात येणार होती. याच खरेदीवरून आता तावडे यांच्यावर टीका करण्यात येते आहे. ई-निविदेचा अवलंब न करता ही खरेदी करण्याचे आदेश दिल्यामुळे राज्याच्या अर्थ मंत्रालयाने ही संपूर्ण खरेदी प्रक्रियाचा स्थगित करण्याचे आदेश दिले. अर्थ मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे ही दरकरार पद्धतीने होऊ घातलेली ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना तावडे यांनी आपण शिक्षण संचालकांना तसे निर्देश दिल्याचे मान्य केले. ते म्हणाले, गेल्या आघाडी सरकारच्या काळातच तत्कालिन शिक्षण मंत्र्यांनी या खरेदीच्या बाजूने आपले मत नोंदविले होते.
तावडे यांच्या निर्देशानंतर शिक्षण संचालक महावीर माने यांनी ठाणे येथील ‘रिलायबल फायर इंजिनिअर्स’ कंपनीला २७ फेब्रुवारी रोजी या खरेदीचे कंत्राट दिले. हे कंत्राट देण्यापूर्वी अर्थ विभागाची त्याला मान्यता घेण्यात आली नाही. त्यानंतर अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकाऱय़ांनी या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर शिक्षण संचालकांनी चार मार्च रोजी ही प्रक्रिया स्थगित केली.