वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशांवर ‘नीट’ परीक्षेची टांगती तलवार असली तरी आयुर्वेदिक, होमिओपथी, युनानी, फार्मसी आदी सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेमार्फतच होतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. त्यामुळे किमान अन्य विद्याशाखांसाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी ‘नीट’ ची सक्ती होणार नसून राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारेच प्रवेश मिळेल. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या वेगवेगळ्या विद्याशाखांसाठी नीट व सरकारी अशा दोन्ही प्रवेशपरीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत.
‘नीट’ सक्ती कायम राहिली तर वैद्यकीय, दंतवैद्यकीय बरोबरच होमिओपथी, आयुर्वेदिक या विद्याशाखांकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांसाठी तयारी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
मात्र ज्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेचा अभ्यास करणे शक्य होणार नाही, त्यांना डॉक्टर होण्यासाठी किमान राज्याच्या प्रवेशपरीक्षेच्या आधारे आयुर्वेदिक, होमिओपथी डॉक्टर होण्याचा पर्याय खुला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’ सक्तीचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (वैद्यकीय शिक्षण परिषद) या शिखर संस्थेने त्याबाबत अधिसूचना जारी केली होती. अन्य अभ्यासक्रमांसाठीही शिखर संस्था असल्या तरी देशपातळीवर त्यांच्या प्रवेशपरीक्षांबाबत नियोजन नाही. त्याचबरोबर वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा घेतली गेली, तरी अन्य विद्याशाखांसाठी मात्र ‘नीट’ चे गुण विचारात घेतले जाणार नाहीत, असे तावडे यांनी स्पष्ट केले.