अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची निच्चांकी घसरण सुरूच आहे. याचा फटका राज्य सरकारला बसणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीमध्ये १८.१६ कोटी रुपयांचा फटका राज्य सरकारला बसण्याची  शक्यता आहे.

८ मे २०१८ रोजी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय शासनाने घेतला होता. तेव्हा डॉलरच्या तुलनेत ७२.६९ रुपये असे मूल्य होते. अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल ऑपरेशन या कंपनीकडून १२७ कोटी ११ लाख रुपयांत हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले होते. मात्र, आता दिवसेंदिवस रुपयाची घसरण सुरू आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य काही दिवसांत ८० रुपयांवर जाणार असल्याचे महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने गृहीत धरले आहे. रुपया आणखी घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत हेलिकॉप्टर खरेदीबाबतचे शुद्धिपत्रक विभागाने काढले आहे. रुपया घसरल्याने हेच हेलिकॉप्टर १४५ कोटी २७ लाख रुपयांना खरेदी करावे लागेल. याचा अर्थ रुपयाची घसरण सुरूच राहिल्यास राज्य सरकारला १८.१६ कोटी रुपये जादा मोजावे लागतील.

सध्या आहे एकच विमान –
राज्य सरकारच्या सेवेत सध्या स्मॉल एक्झुक्युटीव्ह जेट विमान असून त्याची प्रवासी क्षमता आठ इतकी आहे. अतिहत्त्वाच्या व्यक्ती (मुख्यमंत्री/राज्यपाल) या विमानात असताना एक इंजिनियर आणि एक केबिन क्रू सोबत न्यावा लागतो. त्यामुळे अशावेळी सहाच प्रवाशांना जाता येते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणारे राज्य शासनाच्या मालकीचे हेलिकॉप्टर निलंगा येथे अपघातगरस्त झाले होते. तेव्हापासून ते बंदच आहे.