लोटाटा स्मारक रुग्णालयाच्या खारघर  केंद्रामधील रुग्णांच्या सप्टेंबरमधील नमुन्यांमध्ये आढळलेला करोनाचा उत्पर्रिवर्तीत विषाणू हा तुलनेत धोकादायक नाही. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे या रुग्णालयाने सोमवारी स्पष्ट केले.

या केंद्रामध्ये ७०० रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण रुग्णालयाने केले होते. त्यापैकी तीन रुग्णांमध्ये करोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होऊन ‘इ४८४के’ हा नवा विषाणू आढळला आहे.  हा विषाणू ब्रिटनमधील नव्या विषाणूशी साधम्र्य दाखवणारा नाही, मात्र त्यातील काही जैविक रचना ही दक्षिण अफ्रिकेतील विषाणूशी मिळतीजुळती आहे, मात्र तीसुद्धा परिपूर्ण नसल्यामुळे हा विषाणू द. अफ्रिकेतील करोना विषाणू आहे काय, हे  निश्चितपणे सांगता येत नाही, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

रुग्णालयाने अंतर्गत वैद्यकीय विश्लेषणासाठी केलेल्या अभ्यासामध्ये हे नमुने घेण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये केलेल्या अभ्यासात आढळलेले विषाणूचे हे उत्परिवर्तन मात्र तो आतापर्यंत नमुद केलेल्या देशांपैकी कोणत्याही देशातील विषाणूशी मिळतेजुळते नाही, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली.

या व्यक्तींमध्ये कोणत्याही परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे संसर्गाचे निश्चित केंद्र सांगता येणार नाही. या तिघांचीही प्रकृती व्यवस्थित आहे. दोन जणांना कोणतीही लक्षणे नव्हती, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

संसर्गाची तीव्रता आणि मृत्यूंचे प्रमाण

हा विषाणू धोकादायक असता तर सप्टेंबरनंतर आपल्याकडे संसर्गाची तीव्रता वाढायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात मात्र असे काही निदर्शनास आलेले नाही. तसेच मृतांचे प्रमाणही वाढलेले नाही. त्यामुळे या विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

नव्या विषाणूवर लशीची परिणामकता स्पष्ट करताना डॉ. बडवे यांनी सांगितले की, याबाबत आता निश्चितपणे सांगता येणार नाही. संसर्गाचा हाहाकार उडालेल्या इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे झालेले मृत्यूंचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे संसर्गाची भिती बाळगण्यापेक्षा योग्य काळजी घेणे अधिक गरजेचे आहे, असे डॉ. बडवे यांनी अधोरेखित केले.