मुंबई विद्यापीठाने काही वर्षांपूर्वीच बीएमएमच्या विद्यार्थ्यांना मराठीतून परीक्षा देण्याची परवानगी दिली असली, तरी त्यासाठीचे अभ्याससाहित्य मात्र मराठीत पुरेसे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन साठय़े महाविद्यालयाच्या जनमाध्यम विभागाचे विभागप्रमुख प्रा. गजेंद्र देवडा यांनी हा अभ्यासक्रम मराठीतून श्राव्य स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
सर्वसामान्य मराठी भाषक मुलांना माध्यम क्षेत्राचे सखोल ज्ञान व्हावे यासाठी विविध संघटना व पत्रकारांनी सुरू केलेल्या चळवळीच्या रेटय़ामुळे ‘बॅचलर इन मास मीडिया (बीएमएम)’ हा पदवी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने मराठीत सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या परीक्षा मराठी माध्यमातून देऊ लागले आहेत. परंतु, इंग्रजीच्या तुलनेत मराठीत अभ्याससाहित्य पुरेसे उपलब्ध नसल्याने ऐन परीक्षेच्या काळात या विद्यार्थ्यांना अभ्याससाहित्य मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. काही विद्यार्थी स्वत:च इंग्रजीमधील अभ्याससाहित्याचे मराठीत भाषांतर करतात, तर काही इतर महाविद्यालयांमधील विद्यार्थी-शिक्षकांकडून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. काहींना त्यात यश येतेही, परंतु बहुसंख्य विद्यार्थ्यांना हे अभ्याससाहित्य मिळतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्याससाहित्य सहज उपलब्ध करून देण्यासाठी मराठीतून हा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयातील प्रा. गजेंद्र देवडा यांनी पुढाकार घेतला आहे. बीएमएमच्या पाचव्या व सहाव्या सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांसाठी श्राव्य स्वरूपात तयार केला आहे. यंदा ऑक्टोबर व एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांसाठी त्यांनी अभ्यासक्रमाच्या या श्राव्य फिती विद्यार्थ्यांना उपलब्धही करून दिल्या. यात तीन ते दहा मिनिटे वेळाच्या सुमारे ६० ते ७० श्राव्य फितींमध्ये स्वतंत्रपणे अभ्यासक्रमाचे विविध भाग देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवरील व्हॉटस्अ‍ॅपवर या फिती पाठविण्यात आल्याने त्या ऐकून अभ्यास करणे सोपे झाले आहे.
मुंबईमध्ये मराठीतून बीएमएम अभ्यासक्रम शिकविणारी सहा महाविद्यालये आहेत. तसेच मराठीतून परीक्षा देणारे विद्यार्थीही ३०० पेक्षा जास्त असून ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मराठीत छापील अभ्याससाहित्य उपलब्ध नसल्याने त्यांना ते मिळवणे अवघड होत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने त्यांना हा अभ्यासक्रम श्राव्य स्वरूपात तयार करून देण्याची कल्पना सुचली, असे प्रा. देवडा यांनी सांगितले.

मराठीत अभ्याससाहित्य आणि तेही श्राव्य स्वरूपात मिळाल्याने परीक्षेचा अभ्यास करणे सोपे झाले. अनेक संकल्पना यामुळे पुन्हा पुन्हा ऐकता आल्याने त्या समजून घेता आल्या. वर्गात शिकवताना काही भाग समजला नसल्यास या स्वरूपातील अभ्याससाहित्यामुळे तो पुन्हा ऐकून त्याचा अभ्यास करता येतो. तसेच अनेकांना सहज ते व्हॉटस्अ‍ॅपवरून पाठवता येते.
– मितेश घाडी, विद्यार्थी, बीएमएम, साठय़े महाविद्यालय