बारुग्ण विभागात हृदय, मेंदू, अस्थिरोगाशी संबंधित डॉक्टरांची नियुक्ती

मुंबई : बालकामधील जन्मत: असलेल्या व्यंगत्वाचे निदान करण्यासाठी वाडिया रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभाग अद्ययावत केला असून यात आता हृदय, मेंदू, मूत्रपिंड याच्याशी संबंधित आजारांच्या तज्ज्ञांसह अस्थिरोग विभागातील डॉक्टरांचा समावेश असणार आहे.

बाळामध्ये जन्मत:  कोणते व्यंग असल्यास या बाबत जनजागृती नसल्याने निदान लवकर होत नाही आणि त्यामुळे उपचारही सुरू होण्यास वेळ लागतो. या व्यंगामुळे बाळाचा मृत्यू होऊ शकतो किंवा गंभीर आजार आणि अगदी अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून यांचे निदान वेळेत करण्यासाठी वाडिया रुग्णालयात स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभाग चालविला जातो. याद्वारे आत्तापर्यंत १०० हून अधिक बालकांचे निदान करून उपचारही सुरू करण्यास मदत झाली आहे. या विभागात आता बालरोगतज्ज्ञांसह हृदय, मेंदू, मूत्रपिंड, हाडांचे आजार यांचे तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. जेणेकरून अशा आजारांचेही निदान वेळेत होईल.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सुमारे १००० गर्भाची इकोकार्डियोग्राफी केली जाते. यातील जवळपास ५० टक्के गर्भात व्यंग (विकृती) आढळून येते. २०१५-१६ या वर्षांत ८३ प्रकरणात दोष आढळून आला होता. तर २०१६-१७ मध्ये ही संख्या दुपटीने वाढून १७५ इतकी झाली होती.  २०१७-१८ मध्ये ३७५ प्रकरणात बाळामध्ये व्यंग असल्याचे समोर आले आहे. तर २०१८-१९ मध्ये ६१७ प्रकरणात दोष असल्याचे दिसून आले आहे.

उच्च जोखीम असणाऱ्या गर्भवती महिलांना या बाह्य़रुग्ण विभागात पाठवले जाते. येथे डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भाची इकोकार्डियोग्राफी आणि अनुवांशिक चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. नियमित सोनोग्राफीमुळे ११ ते १४ व्या आठडय़ांपर्यंत गर्भात व्यंग असल्याचे कळते. या समस्येला सामोरे जाण्यासाठी पालकांना मानसिक व आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचे कामही या विभागात केले जाते, असे रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ डॉ. पूर्णिमा सातोसकर यांनी सांगितले.

‘अनेकदा एकाच गर्भामध्ये मूत्रपिंड, मणक्याचा विकार आणि मेंदूशी संबंधित विकार असतात. यावर शस्त्रक्रियेनंतरही बाळाला बरे करता येत नाही. अशा स्थितीत दाम्पत्य कायदेशीररीत्या गर्भधारणा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकतात’, असे बाल मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी सूचित केले.

विशेषत: पहिल्या मुलांमध्ये आनुवंशिक दोष असेल तर दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करताना आनुवंशिक विकार विचारात घेणे गरजेचे आहे. यासाठी गर्भधारणेनंतर पहिल्या तिमाहीत बायोप्सीच्या साहाय्याने गर्भाच्या स्थितीची तपासणी करता येऊ शकते. रोगाची स्थिती, निदान आणि उपचार याबद्दल सल्ला या विभागात दिला जाईल, असे रुग्णालयाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.