गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी ११ ऑगस्टपासून विशेष रेल्वे सोडण्यात येणार होत्या. मात्र विशेष गाडय़ांसंदर्भात अंतिम निर्णय होत असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सोमवारी रेल्वे प्रशासनाला सांगण्यात आले. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेला राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा होती.

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यासाठी गेल्या आठवडय़ात परवानगी दिली होती. यात राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात विशेष रेल्वे गाडय़ांचे नियोजन करणे, आरक्षित तिकीट हा ई -पास म्हणून ग्राह्य़ धरणे, मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान अंतर राखणे, निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यास सांगितले. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाडय़ा सोडण्याची मंजुरी रेल्वे बोर्डाकडून घेतली.

११ ऑगस्टपासून २०० फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले. मात्र सोमवारी राज्य सरकारने यावर अंतिम निर्णय होत असून विशेष गाडय़ा न सोडण्याची सूचना रेल्वेला केल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रेल्वेकडून राज्य सरकारच्या नव्या सूचनेची दिवसभर प्रतीक्षा केली जात होती. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.