नागरिकांच्या प्रश्नांमुळे हैराण झालेल्या नगरसेवकांचा प्रशासनाला सल्ला

मुंबई : पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्यामुळे प्रभाग पातळीवर सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये गोंधळ उडू लागला आहे. नागरिकांना उत्तरे देताना नगरसेवकांची त्रेधा होत आहे. या प्रकारामुळे संतप्त नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक रहिवाशांची संख्या लक्षात घेऊन पुरेसा लससाठा उपलब्ध करता येत नसेल तर प्रभाग पातळीवर लसीकरण केंद्र सुरू करू नये, असा सल्ला नगरसेवकांनी प्रशासनास देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील लसीकरणाला गती मिळावी, नागरिकांना घराजवळ करोना प्रतिबंध लस घेता यावी या उद्देशाने २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक अशी केंद्रे सुरू करण्याची घोषणा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केली होती. आयुक्तांच्या आदेशानुसार २४ विभाग कार्यालयांमधील प्रत्येक प्रभागामध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली. छोटेखानी उद्घाटन सोहळा पार पाडून ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी लसीच्या २०० मात्रा या केंद्रांना उपलब्ध करण्यात येत आहेत. दोन दिवसांमध्ये हा साठा संपुष्टात येत असल्यामुळे त्यानंतर मात्र लस कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उभे राहिले आहेत. प्रभागातच लस मिळणार असे समजल्याने खुश झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या आनंदावर अल्पावधीतच विरजण पडले आहे. लस मिळावी म्हणून रहिवाशी स्थानिक नगरसेवकाकडे धाव घेत आहेत. परंतु नगरसेवकांनाही हा प्रश्न सोडविता आलेला नाही.

लसीकरण मोहीम सुरळीत सुरू राहावी यासाठी लशीचा मुबलक साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. लस साठा उपलब्ध करता येत नसेल तर प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करू नये. प्रभागांमध्ये सुरू केलेली लसीकरण केंद्रे लसीअभावी बंद करावी लागू नये याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. अशा केंद्रांना लस उपलब्ध करावी, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. मुंबईतील शासकीय, पालिका आणि खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले होते. लस साठय़ाअभावी काही खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंदच आहे. आता २२७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत, असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

पालघरच्या नागरिकांची मुंबईत नोंदणी

दहिसर आणि आसपासच्या उपगनरांमधील प्रभागांमध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी भाईंदर ते पालघरदरम्यान वास्तव्यास असलेल्या काही रहिवाशांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या विभागातील नागरिकांना प्रभागात लस घेता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना प्रभागातच लस घेता यावी या प्रशासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याची टीका नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.