पाणीकपातीमुळे उंचावरील भागातील पुरवठय़ात समस्या निर्माण होत असल्यास पाणीपुरवठय़ाच्या वेळेत विभागीय स्तरावर बदल करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे उंच-सखल भागातील पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे.

जलाशयांमधील पाणीसाठी पुढील वर्षांपर्यंत पुरवण्याच्या दृष्टीने मुंबईत २७ ऑगस्टपासून पाणीकपात लागू करण्यात आली. यानुसार १५ टक्के पाणीकपात केली जात असून पाणीपुरवठय़ाच्या कालावधीत २० टक्के कपात लागू आहे. मात्र पाण्याचा दाब कमी पडत असल्याने उंचावरील जागा तसेच पुरवठय़ाच्या टोकाकडील ठिकाणांना पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पाणीपुरवठय़ातील फरक दूर करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास जलअभियंत्यांना सांगितले. नियोजन करणाऱ्या सहाय्यक अभियंत्यांना सहाय्यक आयुक्तांनी विविध बैठकांना बोलावण्याचे टाळावे, पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केलेल्या वसाहती व आस्थापनांनी मलनिसारण प्रक्रिया संयंत्र उभारले नसेल तर त्यांना नोटीस द्यावी तसेच खासगी व सार्वजनिक जागांवरील कूपनलिका, विहिरी पाणीसाठय़ांची यादी तयार करावी अशा सूचनाही दिल्या.