मुंबईतील सखल भाग जलमय; वाहतूक विस्कळीत; ठिकठिकाणी झाडांची पडझड

मुंबई : जून संपता संपता सुरू झालेल्या पावसाने सोमवारीही मुंबई शहराला झोडपून काढले. यंदा मुंबई तुंबणार नाही, असे दावे प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात आले असले, तरी शहर आणि उपनगरांतील सर्वच सखल भाग सोमवारी दिवसभर जलमय होते. पावसामुळे जवळपास शंभर ठिकाणी झाडे, फांद्यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.

रविवारी रात्रीपासूनच कोसळणारा पाऊस सोमवारी सकाळीही मुसळधार कोसळत होता. उपनगरी रेल्वे गाडय़ांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या नोकरदारांची सोमवारी सकाळी चांगलीच पंचाईत झाली. पावसामुळे शीव, हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, सायन कोळीवाडा, हिंदू कॉलनी, वडाळा, काळाचौकी, चेंबूर, कुर्ला, विद्याविहार, मानखुर्द, वांद्रे, खेरनगर या परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील वाहतूकही अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.

दिवसभरात शहरात ४६, उपनगरात १२ तर पश्चिम उपनगरात ३९ अशा ९७ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी आल्या. विक्रोळीत झाड पडून सहा रिक्षा त्याखाली दबल्या. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५७८ फांद्या कोसळल्या, तर २०० पेक्षा अधिक झाडे पडली आहेत.

मरिन लाइन्स स्थानकात बांधकामासाठीचे बांबू ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वे ठप्प झाली होती. तर सायन व कुर्ला स्थानकांतील रुळांवर पाणी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास उशिराने धावत होती. शिवडी बसडेपोजवळ असलेल्या टी जे मार्गाजवळील अशोका उद्यानाजवळील संरक्षक भिंत सोमवारी कोसळली. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पावसाळ्याच्या तोंडावर पालिका सज्ज असल्याचा दावा पालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी केला. पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये आपत्कालीन विभागाचे नियंत्रण कक्ष आहेत. तसेच पालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन कक्षाद्वारेही संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. नौदलाची ९ पथके व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही आपले पथक सुसज्ज ठेवले आहे. तसेच पालिकेचे विविध विभाग आणि सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांशी थेट संपर्क साधण्यासाठी आपत्कालीन विभागात ५२ हॉटलाइन आहेत. याद्वारे विमानतळ प्राधिकरण, पोलीस, वाहतूक पोलीस, नौदल अशा सर्व प्राधिकरणांशी संपर्क साधता येऊ शकतो, अशी माहिती चोरे यांनी दिली. गेल्या सात दिवसांत आपत्कालीन विभागाकडे विविध प्रकारच्या तब्बल ४२७० तक्रारींचे दूरध्वनी आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

डेब्रिजमुळे पंप बंद

डेब्रिज अटकल्यामुळे पाणी उपसणारा पंप बंद पडल्याची घटना धारावीत घडली. धारावी परिसरात असलेल्या मुख्याध्यापक नाल्यात मोठय़ा प्रमाणावर डेब्रिज टाकल्यामुळे आज या नाल्याच्या परिसरात पाणी उपसण्यासाठी बसवण्यात आलेल्या १००० अश्वशक्तीच्या पंपात बिघाड झाला. मात्र नंतर लगेचच या पंपाची दुरुस्ती केल्याची माहिती चोरे यांनी दिली.

तर कांजूरमार्ग परिसरात नाल्याच्या शेजारी मातीचा भराव डेब्रिज टाकल्याप्रकरणी एका विकासकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डेब्रिज टाकल्यामुळे या भागात पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे एस विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी हा भराव बाजूला काढण्याची कार्यवाही करून संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दखल केला.

२८७ पंप कार्यान्वित

मुंबईमध्ये सध्या पालिकेची सहा उदंचन केंद्रे सुरू आहेत. ईर्ला, ब्रिटानिया, गझदरबंध, क्लिव्हलॅण्ड, लव्हग्रोव्ह आणि हाजीअली येथील सहा उदंचन केंद्रांवर एकूण ४३ पंप असून त्यापैकी ३२ पंप या चार दिवसांत वापरण्यात आले आहेत. तर विविध ठिकाणी पाणी साचू नये म्हणून ३१५ पंप बसवण्यात आले असून आतापर्यंत २८७ पंप चालवण्यात आल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

सहा रिक्षांचे नुकसान

झाडांच्या छाटणीसाठी पालिकेने ९० कोटींचे कंत्राट दिलेले असले तरी झाडे व फांद्या कोसळण्याच्या दुर्घटना घडतच आहे. घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरात रविवारी मध्यरात्री एक जुने झाड अचानक रस्त्यावर कोसळले. या घटनेत रस्त्यालगत पार्क केलेल्या सहा रिक्षांचे मोठे नुकसान झाले असून झाडाच्या फांद्या बाजूला केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.  रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चार दिवसांत महिन्याची सरासरी

यावर्षी पाऊल लांबला असला तरी चार दिवसांत पावसाने संपूर्ण जून महिन्याची कसर भरून काढली आहे. ७ जूनपासून जेवढा पाऊस गेल्या वर्षी जूनमध्ये पडला त्याच्या ८५ टक्के पाऊस गेल्या चार दिवसांत पडल्याची नोंद आहे.

पावसाची नोंद (१ जुलैपर्यंत)

वर्ष     कुलाबा  सांताक्रूझ

२०१८   ७९४   ७९४

२०१९   ४३३    ६०७

(पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये)

वरळी आणि वांद्रे येथे सर्वाधिक पाऊस

पालिकेने शहर व उपनगरात विविध ६० ठिकाणी ठेवलेल्या पर्जन्यमापक यंत्रांवर  वरळी आणि वांद्रे येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री ११ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वरळीमध्ये २१३ मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये २१४ मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात चेंबूर १५९ मिमी पावसाची नोंद झाली.

‘शीव स्थानकाजवळ पूल असून त्याच्या खांबांमुळे रुळांची उंची वाढवण्यात अडथळे आहेत. त्यामुळे ओव्हरहेड वायरचेही काम करावे लागणार आहे. यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. मात्र, मुंबईत मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यानेच वेळापत्रक बिघडले,’

– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे