मुंबई मनपाने कंगनाचं कार्यालय पाडल्यानंतर आता  कंगना रणौतने शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. मात्र, खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याची मागणी हास्यास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याचबरोबर आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत, मला कोर्टाची लढाई माझ्यासाठी नवी नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. कंनगा रणौत यांच्या वकीलांच्या मते संजय राऊत यांच्यामुळे बीएमसीला कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करावी लागलेली आहे.

याचबरोबर ड्रग्सप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली दिपीका पदुकोण राजकीय आखाड्यात उतरण्यास तयार झालेले बिहारचे डीजीपी यासह अनेक मुद्यांवर राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या शैलीत भाष्यं केलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्राला बदनाम करण्याचं सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय : संजय राऊत

“ आम्ही कोणतीही लढाई लढायला तयार आहोत. कोर्टाची लढाई मला नवीन आहे का? १६० खटले माझ्यावर सुरू होते. महाराष्ट्रातील असं कोणतही कोर्ट नाही जिथं संजय राऊतवर केस पडली नाही.१९९२ ची दंगल, बाबरी प्रकरण, मराठी माणसांच्या लढ्यामध्ये आंदोलन आणि संघर्ष हा आमचा आत्मा आहे. कोर्ट-कचेऱ्या ह्या होतचं असतात.”असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “बाबरीपासून ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले…”; संजय राऊतांचं कंगनाला उत्तर

कंगना रणौत प्रकरणात संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. कंनगा रणौत यांच्या वकीलांच्या मते संजय राऊत यांच्यामुळे बीएमसीला कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करावी लागलेली आहे. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले, “ हे हास्यास्पद आहे. शेवटी आपल्याकडे न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाला व निर्णयाला झुकून तो मान्य करण्याची परंपरा आहे. न्यायालयाचा नेहमी मान राखला जातो, तसा आताही राखला जाईल. बेकायदेशीर बांधाकाम जर कुठं झालं असेल, तर ते तोडण्यासंदर्भात महापालिकेचा अधिकार आहे. मनपाची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मनपा आयुक्त आहेत, ते ठरवतात. राज्य सरकार देखील ठरवत नाही किंवा कुणी नेते अथवा खासदार असतील ते देखील ठरवत नाहीत. अनेकदा तर न्यायालय देखील ठरवू शकत नाही.”

आणखी वाचा- कंगना ऑफिस तोडफोड प्रकरण: संजय राऊत यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी

“ बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून कांगावा करायचा आणि मला त्यात ओढून परत राजकारण करायचं. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याची एक सुनियोजित अशी एक तयारी सुरू आहे. महाराष्ट्राला, मुंबईला व मराठी माणसाला बदनाम करायचं हे फार मोठं षडयंत्र पडद्यामागं रचलं जात आहे. बिहारच्या डीजी यांनी निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला आहे. त्या अगोदर दोन महिने सातत्याने ते महाराष्ट्राला बदनाम करत होते, पोलिसांना बदनाम करत होते. काल त्यांनी राजीनामा दिला ते आता राजकीय पक्षात जातील. त्यामुळे जे लोकं महाराष्ट्र व मुंबईविरोधात बोलत आहेत. त्यांच पुढील पाऊल हे राजकारणात आहे. महाराष्ट्राला व मुंबईला जर तुम्ही पायपुसनं म्हणून वापरणार असाल तर माझ्यासारखा माणूस जो बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झाला आहे. जो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो आहे, तो हे सहन करणार नाही.” असं यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.