कंगना रणौत ऑफिस तोडफोड प्रकरणातली सुनावणी उद्या म्हणजेच २३ सप्टेंबरला होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि ज्या अधिकाऱ्याने तोडफोडीच आदेश दिले त्या अधिकाऱ्याला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना ‘उखाड डाला’ या आशयाची प्रतिक्रिया दिल्याचे पुरावे कंगनाच्या वकिलांनी सादर केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलेला दिलासा तूर्तास तरी कायम आहे. दरम्यान या सगळ्यात आपले सुमारे २ कोटींचे नुकसान झाले आहे असे कंगनाचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण?

कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरोधात विविध संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. सिनेसृष्टीतून आणि राजकीय वर्तुळातून या प्रतिक्रिया आल्या. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात तर ट्विटर वॉर रंगले होते. त्यानंतर ज्या कुणाची हिंमत असेल त्यांनी मला अडवून दाखवा मी ९ सप्टेंबरला मुंबईत येते आहे असं कंगनाने म्हटलं होतं. दरम्यान या सगळ्या वादानंतर कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षाही पुरवली होती. कंगना ९ सप्टेंबर रोजी जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिच्या ऑफिसचा काही भाग अनधिकृत ठरवत तो तोडण्यात आला. या प्रकाराविरोधात कंगनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

कंगना ज्यादिवशी मुंबईत आली होती त्याच दिवशी रिपाइचे नेते रामदास आठवले यांनीही तिची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेने बदला घेण्याच्या भावनेतून हे कृत्य केल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान कंगनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जी केलेली कारवाई आहे ती राजकीय आकसातून आहे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं होतं.