अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर या चारही अभिनेत्रींनी ड्रग्जचं सेवन करत नसल्याचं अंमलपदार्थ विरोधी पथकाकडे (एनसीबी) स्पष्ट केलं. ड्रग्ज प्रकरणी या चौघींची एनसीबीकडून चौकशी झाली. “त्यांनी सांगितलं की आम्ही सिगारेट पण ओढत नाही”, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्जचं सेवन करायचा का याविषयी माहिती नसल्याचंही या चार अभिनेत्रींनी एनसीबीकडे स्पष्ट केलं. एनसीबीने या चारही अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसादला अटक

धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद यांना एनसीबीने शनिवारी अटक केली. सुशांतच्या मृत्यूबाबत त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. क्षिजीत यांच्यासोबत एनसीबीने धर्मा प्रॉडक्शनचे माजी सहायक दिग्दर्शक अनुभव चोप्रा यांच्याकडेही चौकशी केल्याचं समजतंय.