माजी संरक्षणमंत्री आणि कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी (दि.२९) निधन झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कामगारांच्या अस्मितेसाठी लढा देणारा नेता आपण गमावला, अशा शब्दांत त्यांनी फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

पवार म्हणाले, देशातील कामगार चळवळीला बळ आणि नवी दिशा देणारे लढवय्ये नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले याचे मला मोठे दुःख झाले आहे. जॉर्ज १९४९ च्या सुमारास मुंबईत आले आणि ते मुंबईचेच झाले. मुंबईत कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची सशक्त संघटना उभारली. रेल्वे कामगार संघटनांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.

जॉर्ज फर्नांडिस एक उत्तम संसदपटू होते तसेच त्यांनी देशाचे उद्योगमंत्री आणि संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना एक प्रभावी प्रशासक म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. ते एक निष्णांत वाकपटू होते. विविध भाषांवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते, अशी त्यांची वैशिष्ट्ये सांगताना पवारांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या.

स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आणि सामान्यांच्या-कामगारांच्या अस्मितेसाठी सतत लढा देणारा नेता आपण गमावला आहे. ते माझे चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने मी एका चांगल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो आहे, अशा शब्दांत पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.