मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. मात्र त्यानंतर शनिवार आणि रविवारी मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात आरेमध्ये मानवी साखळी करुन निषेध व्यक्त केला. तर या समितीमधील दोन वृक्षतज्ज्ञांनी आपली फसवणूक करुन वृक्षतोड करण्याच्या बाजूने मत द्यावयास लावल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत आपली फसवणूक झाल्याचे सांगत, समिती सदस्य असणाऱ्या डॉ. शशीलेखा सुरेशकुमार आणि डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी आपला राजीनामा परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गुरुवार झालेल्या बैठकीमध्ये आमची फसवणूक झाली. बैठक संपवण्यासाठी मतदान घेत असल्याचे सांगून वृक्षतोडीचा निर्णय घेण्यासाठी मतदान घेण्यात आल्याचा आरोप या तज्ज्ञांनी केला आहे. मतदान झाल्यानंतर हे मतदान आरेमधील वृक्षतोडण्यासंदर्भात असल्याचे आम्हाला कळवण्यात आल्याचे या दोघांनी म्हटले आहे. आरेमधील मेट्रो कारशेडवरुन मुंबईमधील पर्यावरण प्रेमी संस्था आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.

सुरेशकुमार यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये ‘आपली या प्राधिकरण समितीमध्ये नियुक्ती झाल्यापासून येथे कधीच निर्णय घेताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही तसेच निर्णयही अगदी घाईत घेण्यात आले,’ असा आरोप केला आहे. ‘मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरेमधील झाडे कापण्यास परवाणगी देण्यासाठी मी आणि माझे सहकारी वृक्षतज्ज्ञ जबाबदार असल्याचे आरोप करण्यात आले. मी स्वत: वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेतले असून पर्यावरणप्रेमी असल्याने आमच्यासाठी या प्रकरणामध्ये सत्यच सर्वात महत्वाचे आहे,’ असं सुरेशकुमार यांनी म्हटले आहे.

साळुंखे यांनी तर आपण प्रस्तावित २७०२ झाडांपैकी १२०० झाडे कशी वाचवली जाऊ शकता याबद्दल मत मांडल्याचे म्हटले आहे. ‘मी सादर केलेल्या अहवालामध्ये ५० फुटांपेक्षा उंच आणि रस्त्याच्याकडेला असणारी झाडे कापली जाऊ नयेत असं म्हटलं होतं. २७०२ झाडे कापण्याचा निर्णय घाईत घेण्यात आला आहे. आम्हाला या इतक्या महत्वाच्या विषयावर मतदान घेतले जाणार असल्याची कल्पनाही देण्यात आली नव्हती,’ असं साळुंखे यांनी म्हटल्याचे वृत्त ‘मुंबई मीरर’ने दिले आहे.

आरेमधील झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर शनिवारी आणि रविवारी मुंबईमधील आरे परिसराबरोबर चर्चगेट आणि मुंबई सीएसटी या रेल्वे स्थानकांबाहेर पर्यावरणप्रेमींनी आंदोलन करुन या निर्णयाचा विरोध केला.