एकीकडे निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असतानाच मुंबईतील हवा मात्र प्रचारफेऱ्यांना मानवणारी आहे. शुक्रवारी तापमापकातील पाऱ्याने थेट ३८ अंश सेल्सिअसची उसळी घेतल्याने अनेक कार्यकर्त्यांना घाम फुटला होता. मात्र पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाने हे तापमान दाणकन ३३ अंशांवर खाली आणले. पश्चिम दिशेने येणाऱ्या तुलनेने थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तापमानावर नियंत्रण राहिले आहे.
उन्हाळा सुरू झाला असला तरी शनिवार-रविवारच्या ढगाळ वातावरणाने अनेकांना पावसाळी हवेची आठवण करून दिली. मात्र हे ढग केवळ दोन दिवसांचेच पाहुणे असून उन्हाळा सुरू झाल्यावर  काही वेळा अशा प्रकारे ढगाळ वातावरण होते, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. थंडी गेल्याच महिन्यात परतली असून वाऱ्यांची दिशा आता पश्चिमेकडून आहे. मार्चमध्ये जमिनीवरून येणाऱ्या तप्त वाऱ्यांऐवजी तुलनेने थंड असलेले वारे समुद्रावरून येत आहेत. त्यामुळे दुपारचे कमाल तापमानही नियंत्रणात राहते. मात्र कधीतरी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची वेळ गडबडते आणि तापमान कमी अधिक होते. शुक्रवारी, चार एप्रिल रोजी समुद्रावरून वारे वाहण्यास दुपार उलटून गेल्याने तापमान थेट ३८ अंश से. वर गेले. शुक्रवारी ज्या वेगाने पारा वर गेला तेवढय़ाच वेगाने तो शनिवारी खाली आला. एप्रिलमधील कमाल तापमान सरासरी ३३ अंश से. असते. गेल्या दहा वर्षांत कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर गेल्याचेही दिसत असले तरी त्यांचा प्रभाव एखाद दोन दिवसांपुरताच होता. या काळात बाष्पयुक्त वारे तापमानावर प्रभाव दाखवतात, असे मुंबई हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी सांगितले. मात्र तापमान कमी झाले तरी हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने तापमानाचा ताप अधिक जाणवतो. त्यामुळे प्रचारफेऱ्यांसाठी दुपारच्या उन्हात बाहेर पडणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना
त्रास होत असला तरी राज्याच्या
अंतर्गत भागाप्रमाणे उन्हाचे चटके सतावणार नाहीत.