वर्षभरात ३०० कोटींची उलाढाल झालेला बाजार सुरक्षेच्या कारणास्तव बंद

शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासोबतच ग्राहकांना रास्त दरात धान्य, भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी ‘आठवडा बाजार’ ही संकल्पना राबवणाऱ्या राज्य सरकारच्या दारातूनच शेतकऱ्यांना हुसकावून लावले जात आहे. विधान भवन परिसरात गेल्या वर्षभरात सुरू असलेला आठवडा बाजार  सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याच्या सूचना विधान भवन प्रशासनाने केल्या आहेत. त्यातच मुंबई महापालिकेनेही या आठवडा बाजाराला जागा देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांना थेट उपलब्ध झालेली मुंबईतील बाजारपेठ बंद होण्याची चिन्हे आहेत.

व्यापारी आणि अडतीच्या चक्रव्यूहातून शेतमालाची सुटका करतानाच शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट शहरात विकण्याची मुभा देणाऱ्या या आठवडा बाजार योजनेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, शहरातील लोकांनाही दर्जेदार भाज्या व फळे किफायतशीर दरांत मिळत असल्याने या बाजारांना ग्राहकांचीही गर्दी उसळते. राज्यभरात जवळपास १३० ठिकाणी असे आठवडा बाजार सुरू असून त्यातून शेतकऱ्यांना दर आठवडय़ाला एकत्रितपणे सहा ते सव्वा सहाकोटी रुपये उत्पन्न मिळते. दक्षिण मुंबईत विधान भवनाच्या आवारात मिळणारी ताजी भाजी आणि फळे खरेदी करण्यासाठी रविवारी मोठय़ा प्रमाणात ग्राहक या बाजारात येतात. विधान भवन परिसरातील बाजार एवढा लोकप्रिय झाला आहे की, गेल्या वर्षभरात या एकाच बाजारात सात कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. मात्र, असे असतानाच विधान भवन परिसरातील हा बाजार बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधान भवनाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करीत प्रशासनाने या बाजारात विरोध केला आहे. विधान भवनाच्या सहसचिवांनी पोलीस उपायुक्तांना एक पत्र पाठवून आजवर भवनाच्या आवारात भरणारा हा बाजार एअर इंडियाच्या समोरच्या गल्लीतील झुणका भाकर केंद्राजवळ भरविण्यात यावा असे कळविले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश विधानभेत पीईटीएन नावाची घातक स्फोटके सापडली होती. त्या घटनेच्या पाश्र्वभूमीवरसुरक्षेच्या संदर्भात झालेल्या बैठकीत विधानभवन वाहन तळावर प्रत्येक रविवारी भरणारा आठवडे बाजार भरविण्यात येऊ नये. त्याऐवजी झुणका भाकर केंद्राजवळ भरविण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे.